ॲमेझॉन २०२७ च्या सुरुवातीला यूकेमध्ये 'Amazon Autos' ही कार विक्री सेवा सुरू करणार आहे. यात ह्युंदाईच्या नव्या आणि सेकंड हँड कार्स ऑनलाइन सर्च करून, किमतींची तुलना करून बूक करता येतील. भारतात ही सर्व्हिस कधी येईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

आपण आतापर्यंत ऑनलाइन ग्रोसरी, मोबाईल आणि घरगुती वस्तू विकत घेत आलो आहोत. पण आता चक्क कारही ॲमेझॉनवर सर्च करून विकत घेता येणार आहे. जगातील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन यूकेमध्ये आपली कार विक्री सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

२०२७ च्या सुरुवातीला 'Amazon Autos' नावाने ही सर्व्हिस लाँच होईल. यात नव्या कार्ससोबतच सेकंड हँड कार्सही ग्राहकांना विकत घेता येतील. अमेरिकेबाहेर ॲमेझॉनने कार विक्री सेवा सुरू केलेला यूके हा पहिला देश ठरणार आहे.

Amazon Autos म्हणजे काय?

ॲमेझॉनने अमेरिकेत डिसेंबर २०२४ मध्ये 'Amazon Autos' नावाने ही सेवा सुरू केली होती. आता ती यूकेमध्ये विस्तारली जात आहे. ग्राहकांना एकाच प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार मॉडेल्स सर्च करता यावे, त्यांच्या किमतींची तुलना करता यावी आणि आवडीची कार निवडता यावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यासाठी ॲमेझॉन कार कंपन्या आणि अधिकृत डीलर्ससोबत मिळून काम करत आहे.

कोणकोणत्या कार्स घेता येतील?

यूकेमध्ये जेव्हा Amazon Autos लाँच होईल, तेव्हा ह्युंदाई (Hyundai) ही त्यांची पहिली पार्टनर कंपनी असेल. या माध्यमातून ह्युंदाईच्या नव्या आणि सर्टिफाइड सेकंड हँड कार्स विक्रीसाठी उपलब्ध असतील.

सुरुवातीच्या मॉडेल्सची यादी:

  • ह्युंदाई आयोनिक ३ (IONIQ 3)
  • ह्युंदाई आयोनिक ५ (IONIQ 5)
  • ह्युंदाई कोना (KONA)
  • ह्युंदाई आय२० (i20)

यात इलेक्ट्रिक, हायब्रिड आणि पेट्रोल कार्सचा समावेश असेल. नव्या कार्ससोबतच ह्युंदाईच्या सर्टिफाइड जुन्या कार्सही ग्राहकांना सर्च करता येतील. तसेच, यूकेमधील प्रमुख कार डीलर 'व्हर्टू मोटर्स' (Vertu Motors) च्या माध्यमातूनही सेकंड हँड कार्स लिस्ट केल्या जातील. येत्या काही महिन्यांत आणखी कार कंपन्या आणि डीलर्स या सेवेत जोडले जातील, असं ॲमेझॉनने सांगितलं आहे.

ॲमेझॉनवर कार कशी विकत घ्यायची?

ॲमेझॉनवर एखादी वस्तू ऑर्डर केली की ती थेट घरी येते. पण कारच्या बाबतीत ही प्रोसेस थोडी वेगळी आहे. ग्राहक Amazon Autos वर जाऊन ब्रँड, मॉडेल, व्हेरियंट आणि रंग निवडून कार सर्च करू शकतील. तिथे त्यांना कारची उपलब्धता आणि किंमत दिसेल.

कार पसंत पडल्यावर ग्राहक ॲमेझॉनवरूनच ती बूक करू शकतात. पण पुढची सगळी फायनल प्रोसेस संबंधित डीलरच्या शोरूममध्येच होईल. तिथे कागदपत्रांची तपासणी, पेमेंट आणि कारची डिलिव्हरी होईल. थोडक्यात सांगायचं तर, कार शोधणे, किंमत पाहणे आणि बुकिंग करणे हे सगळं ऑनलाइन होईल अन् फायनल खरेदी डीलरकडे जाऊन करावी लागेल.

जुनी कार देऊन नवी घेता येईल का?

या सेवेत अजून एक भारी फीचर आहे, ते म्हणजे तुमच्या जुन्या कारची व्हॅल्यू चेक करणे. ग्राहकांनी आपल्या जुन्या कारचे डिटेल्स टाकले की त्यांना लगेच अंदाजित किंमत कळेल. ती रक्कम नवी कार घेताना वापरता येईल. पण, जुन्या कारची फायनल किंमत डीलर प्रत्यक्ष कार पाहिल्यानंतरच ठरवेल. शिवाय, ॲमेझॉनवर फायनान्सचे पर्यायही पाहता येतील. यूकेमध्ये चालणाऱ्या PCP (Personal Contract Purchase) आणि HP (Hire Purchase) सारख्या फायनान्स स्कीममधून ईएमआय (EMI) किती येईल, हेही ग्राहकांना समजू शकेल.

डीलर्सचा काय फायदा?

या सेवेमुळे ॲमेझॉन सध्याच्या कार डीलर्सनाही आपल्या प्लॅटफॉर्मवर जोडत आहे. यामुळे डीलर्सची कार इन्व्हेंटरी जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचेल. दुसरीकडे, ग्राहक ॲमेझॉनवरच कारची सगळी माहिती घेऊन आणि निर्णय पक्का करून शोरूममध्ये येतील. यामुळे डीलर आणि ग्राहक दोघांचाही वेळ वाचेल, असा ॲमेझॉनचा दावा आहे. अमेरिकेत १५० पेक्षा जास्त शहरांमध्ये ३५ कार ब्रँड्स ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत. आता हेच मॉडेल यूकेमध्ये राबवलं जात आहे.

भारतात कधी येणार?

यूकेमध्ये ही सर्व्हिस लाँच होणार असल्याची बातमी आल्याने, भारतीय ग्राहकांनाही याची उत्सुकता लागली आहे. पण, भारतात Amazon Autos कधी सुरू होणार, याबाबत ॲमेझॉनने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या फक्त यूकेमध्येच याचा विस्तार फिक्स झाला आहे. अमेरिकेबाहेर Amazon Autos लाँच होणारा यूके हा पहिला देश आहे.

त्यामुळे २०२७ मध्ये ही सेवा भारतात येईल, असं आत्ताच सांगता येणार नाही. भारतातील कार कंपन्या, डीलर्स, आरटीओ (RTO) रजिस्ट्रेशन आणि विक्रीचे नियम या सगळ्याशी ॲमेझॉन कसं जुळवून घेणार, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. जोपर्यंत भारतात ही सर्व्हिस लाँच करण्याची अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत भारतीय ग्राहकांना वाटच पाहावी लागेल.