भारत-श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर संजय मांजरेकर यांनी शुभमन गिलच्या कर्णधारपदावर आपलं मत मांडलं आहे. त्यांनी गिलला १० पैकी ७ किंवा ८ गुण दिले, पण खेळपट्टीचं स्वरूप आणि श्रीलंकेच्या फलंदाजांची झुंज पाहता, गिलला इतक्यात पारखता येणार नाही, असंही ते म्हणाले.

कोलंबो: भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश आलं. फॉलोऑनची नामुष्की ओढवूनही श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना दाद दिली नाही. दोन्ही डावात शतक ठोकणाऱ्या सोनल दिनुशाने श्रीलंकेला विजयसारखा ड्रॉ मिळवून दिला. या सामन्यानंतर, भारताचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

मांजरेकर म्हणाले की, खेळपट्टीची परिस्थिती आणि श्रीलंकेच्या फलंदाजांनी दिलेली झुंज समजून घेणं महत्त्वाचं आहे. पाचव्या दिवशी श्रीलंकेतील खेळपट्ट्या खूप संथ होतात आणि भारतीय गोलंदाजांना टक्कर देणाऱ्या लंकन फलंदाजांचं कौतुक करायला हवं, असं मांजरेकर यांनी स्पष्ट केलं. 'भारताला जरी विजयासाठी लक्ष्य मिळालं असतं, तरी ते गाठणं सोपं नसतं. तरीही, मी गिलच्या कॅप्टन्सीला १० पैकी ७ किंवा ८ गुण देईन. एक कर्णधार म्हणून आपण त्याला आत्ताच पारखू शकत नाही. या कसोटीत त्याची कॅप्टन्सी परिस्थितीनुसार योग्य होती,' असं मांजरेकर म्हणाले.

पहिल्या डावात २१३ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने चौथ्या दिवशी श्रीलंकेला फॉलोऑन दिला होता. दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ शिल्लक असताना लंकेला कमी धावसंख्येवर गुंडाळण्याचा भारताचा प्लॅन होता. पण सोनल दिनुशा आणि केसरा नुवांथा यांनी पाचव्या दिवशी दिलेली झुंज भारताच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली.

भारताने ८९.४ षटकं टाकल्यानंतर फॉलोऑन देण्याचा निर्णय स्वाभाविक होता, पण त्यानंतर भारतीय गोलंदाज थकले आणि त्यांना आपले प्लॅन्स मैदानावर उतरवता आले नाहीत. कसोटीतील दुसरं आणि मालिकेतील तिसरं शतक झळकावणाऱ्या सोनल दिनुशाच्या जोरावर श्रीलंकेने ४०० धावांचा टप्पा ओलांडला. कसोटी सामन्यांच्या चौथ्या डावात १५० पेक्षा जास्त षटकं फलंदाजी करण्याची ही केवळ आठवी वेळ होती.

यूट्यूब व्हिडिओ प्लेयर