एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्सकडे २५ टक्के शेअरची मागणी केली आणि नंतर ती १८ टक्क्यांवर आणली, अशा चर्चा आहेत. यावर CSK मॅनेजमेंटने आधी ३ टक्के आणि नंतर जास्तीत जास्त ५.५ टक्के देऊ केले. पण, दोघांमध्ये एकमत न झाल्याने चर्चा फिस्कटल्याचे म्हटले जात आहे.

चेन्नई : २००८ पासून एमएस धोनी हा चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) म्हणजेच चेहरा आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून CSK ची ओळख धोनीमुळेच आहे. धोनीच्या कॅप्टन्सीखाली चेन्नईने पाच आयपीएल आणि दोन चॅम्पियन्स लीग टी-२० ट्रॉफी जिंकल्या आहेत.

धोनीच्या नेतृत्वानेच चेन्नई फ्रँचायझीला देशभरात चाहते मिळवून दिले. दोन वर्षांपूर्वी धोनीने ऋतुराज गायकवाडला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. त्यानंतर तो हळूहळू सामन्यांमधून बाजूला होताना दिसला. मागच्या सीझनमध्ये तो टीमचा भाग होता, पण त्याने आपलं महत्त्व कमी करून CSK पासून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला.

आता अशा चर्चांना उधाण आलं आहे की, एमएस धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स मॅनेजमेंटमध्ये शेअरवरून वाद सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, धोनीने सुरुवातीला २५ टक्के शेअरची मागणी केली होती, जी नंतर त्याने १८ टक्क्यांपर्यंत कमी केली. दुसरीकडे, CSK मॅनेजमेंटने आधी ३ टक्के आणि नंतर चर्चेअंती जास्तीत जास्त ५.५ टक्के शेअर देऊ केले. पण, दोघांमध्ये एकमत न झाल्याने ही चर्चा फिस्कटल्याची माहिती समोर येत आहे. अर्थात, धोनी किंवा टीम मॅनेजमेंटने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सध्या क्रिकेट विश्वात ही एक मोठी चर्चा बनली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा माजी खेळाडू आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवर आश्चर्य व्यक्त करत विचारले आहे की, "कोणती फ्रँचायझी आपल्या माजी खेळाडूला ४०० मिलियन डॉलर (सुमारे ३,३०० कोटी रुपये) देईल का?" तो म्हणतो, "या चर्चा खऱ्या असण्याची शक्यता कमी आहे. चेन्नई सुपर किंग्स हा एक मोठा ब्रँड आहे. CSK ची व्हॅल्यू १.८ बिलियन डॉलर आहे, अशावेळी धोनीने २५ टक्के शेअर मागितले हे कसं खरं असू शकतं? हे शक्यच नाही. कोणीही कोणाला ४०० मिलियन डॉलर देणार नाही." आकाश चोप्रा पुढे म्हणाला, "CSK ने देऊ केलेले ५.५ टक्के शेअरसुद्धा एक मोठी रक्कम आहे. त्यामुळे, ही सगळी कुणीतरी तयार केलेली कहाणी वाटतेय."

CSK च्या ब्रँड व्हॅल्यूनुसार, धोनीने मागितलेली रक्कम अंदाजे ३,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कॉर्पोरेट जगात एवढी मोठी रक्कम कोणीही सहज देत नाही, असं आपलं कॉर्पोरेट बिझनेसचं लॉजिक वापरून आकाश चोप्राने या मीडिया रिपोर्ट्सना फेटाळून लावले आहे.