भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. युरोपियन T20 प्रीमियर लीगमध्ये त्याने 'डब्लिन गार्डियन्स' ही टीम विकत घेतली आहे. युरोपमध्ये क्रिकेटचा विकास करणं हे आपलं ध्येय असून, त्यासाठी T20 फॉरमॅट सर्वोत्तम असल्याचं द्रविडने म्हटलं आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'द वॉल' अर्थात राहुल द्रविड आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. खेळाडू आणि कोचच्या भूमिकेनंतर, द्रविड आता टीम मालक बनला आहे. युरोपमध्ये सुरू होणाऱ्या पहिल्यावहिल्या युरोपियन T20 प्रीमियर लीग (ETPL) मध्ये त्याने 'डब्लिन गार्डियन्स' ही टीम विकत घेतली आहे. जिओस्टारशी बोलताना द्रविडने या नव्या भूमिकेबद्दल आणि युरोपमध्ये क्रिकेट वाढवण्याच्या आपल्या योजनेबद्दल सांगितलं.

युरोपमध्ये क्रिकेट वाढवण्यावर द्रविडचा भर

युरोपमध्ये क्रिकेटचा विकास करण्यासाठी ETPL कशी मदत करू शकते, यावर द्रविडने आपलं मत मांडलं. तो म्हणाला, "युरोपमध्ये क्रिकेटसाठी खूप प्रतिभा आणि संधी आहे, असं मला नेहमीच वाटत आलं आहे. तिथल्या मुलांना आणि मुलींना क्रिकेट खेळता यावं, यासाठी हा एक योग्य प्लॅटफॉर्म आहे. एक माजी क्रिकेटपटू म्हणून, क्रिकेटचा विस्तार व्हावा आणि अधिकाधिक लोकांनी हा खेळ खेळावा, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे."

टीम मालक म्हणून आपल्या भूमिकेबद्दल बोलताना तो म्हणाला, "या लीगशी जोडलेले लोकही खूप चांगले आहेत. 'अ‍ॅमस्टरडॅम फ्लेम्स' टीमसोबत स्टीव्ह वॉ आहे, ज्यांना मी नेहमीच आदर्श मानतो. जेमी डायरही त्यांच्यासोबत आहे. ग्लेन मॅक्सवेल एका टीमचा भाग आहे. अभिषेक बच्चनसारख्या लोकांमध्ये खेळाबद्दल जी आवड आहे आणि त्यांनी ही लीग उभी केली आहे, ते पाहून वाटलं की चांगले लोक काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहेत."

द्रविड पुढे म्हणाला, "मी विचार केला की, यात का सामील होऊ नये? काहीतरी वेगळं करून बघूया. मी नेहमी खेळाडू किंवा कोच म्हणून काम केलं आहे. पण आता टीमसाठी कोच आणि खेळाडू निवडणं, मार्केटिंग, फायनान्स यांसारख्या गोष्टी सांभाळणं, हे माझ्यासाठी नवीन आणि आव्हानात्मक आहे, पण तितकंच रोमांचकही आहे."

'खेळाच्या प्रसारासाठी T20 सर्वोत्तम'

द्रविडने कसोटी क्रिकेट आणि T20 क्रिकेट यावरही आपलं मत मांडलं. त्याच्या मते, जागतिक स्तरावर क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी T20 हा सर्वोत्तम फॉरमॅट आहे. तो म्हणाला, "व्यक्तिशः मला कसोटी क्रिकेट खूप आवडतं; तो खेळाचा नंबर वन फॉरमॅटच राहील. पण आपल्याला वास्तववादी बनायला हवं. जर आपल्याला क्रिकेटचा विस्तार करायचा असेल आणि तो फक्त काही देशांपुरता मर्यादित ठेवायचा नसेल, तर T20 हा एक उत्तम फॉरमॅट आहे. पुढच्या पिढीने या खेळाचा आनंद घ्यावा, तो खेळावा असं वाटत असेल, तर T20 मुळेच आपण अधिकाधिक लोकांना या खेळाशी जोडू शकतो."

"एकदा का लोक या खेळाशी जोडले गेले, की मग आपण खेळाच्या मोठ्या फॉरमॅट्सबद्दल विचार करू शकतो. पण जेव्हा तुम्ही सुरुवात करत असता, तेव्हा T20 फॉरमॅटच योग्य आहे," असं म्हणत द्रविडने आपलं मत स्पष्ट केलं.