भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या कारकिर्दीत पाठिंबा देणाऱ्या कुटुंबीयांचे, बीसीसीआय, रेल्वे, यूपीसीए, आंध्र आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे त्याने आभार मानले.
लखनऊ : भारतीय क्रिकेटपटू आणि रेल्वेचा खेळाडू कर्ण शर्माने व्यावसायिक क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर होणारा सामना त्याचा शेवटचा सामना असेल. हा सामना यूपी टी-२० लीगमध्ये कानपूर सुपर स्टार्स आणि मीरत मॅव्हरिक्स यांच्यात होणार आहे. यानंतर प्रशिक्षक किंवा क्रिकेटशी संबंधित इतर जबाबदाऱ्या सांभाळण्याचा आपला विचार असल्याचं कर्ण शर्माने स्पष्ट केलं.
आपल्या संपूर्ण कारकिर्दीत पाठिंबा देणारे कुटुंबीय, बीसीसीआय, रेल्वे, यूपीसीए, आंध्र आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन यांचे आणि चाहत्यांचे त्याने आभार मानले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) एक खास विक्रम कर्ण शर्माच्या नावावर आहे. सलग तीन सिझनमध्ये तीन वेगवेगळ्या टीम्ससोबत आयपीएल ट्रॉफी जिंकणारा तो इतिहासातील एकमेव खेळाडू आहे.
कर्ण शर्मा आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या संघांकडून खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण ९० सामने खेळले असून, त्यात २६.६८ च्या सरासरीने आणि ८.३८ च्या इकॉनॉमी रेटने ८३ विकेट्स घेतल्या आहेत.
भारतासाठी कर्ण शर्मा एकूण चार सामने खेळला. यामध्ये एक टेस्ट, दोन वनडे आणि एका टी-२० सामन्याचा समावेश आहे, ज्यात त्याने एकूण पाच विकेट्स घेतल्या. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲडलेड टेस्टमध्ये त्याला अनपेक्षितपणे पदार्पणाची संधी मिळाली होती. त्या सामन्यात चार विकेट्स घेऊन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याच वर्षी तो मर्यादित षटकांचे सामनेही खेळला, पण आंतरराष्ट्रीय टीममध्ये तो आपलं स्थान पक्कं करू शकला नाही. तरीही, देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये एक विश्वासू मॅच विनर म्हणून कर्ण शर्माने आपली ओळख निर्माण केली.


