आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. महेला जयवर्धनेने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला असून, त्याची फ्रँचायझीसोबतची १० वर्षांची साथ आता संपली आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने तीन वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं.
मुंबई : आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स (MI) फ्रँचायझीमध्ये मोठा बदल झाला आहे. महेला जयवर्धनेने संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. जयवर्धनेने गेल्या दोन हंगामात दुसऱ्यांदा ही जबाबदारी सांभाळली होती. याआधी २०१७ ते २०२२ या काळातही तो मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक होता.
शनिवारी मुंबई इंडियन्सने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. "महेला जयवर्धने मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होत आहे. यासोबतच त्याची #OneFamily सोबतची दशकभराची साथ संपत आहे," असं फ्रँचायझीने म्हटलं आहे. जयवर्धनेच्या कार्यकाळात मुंबई इंडियन्सने तब्बल तीन वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली. २०१७ ते २०२२ आणि पुन्हा २०२४ ते २०२६ या दोन्ही कार्यकाळात त्याने संघाची संस्कृती घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शिस्त, एकमेकांना सहकार्य आणि 'आधी संघ' या विचारसरणीवर त्याने नेहमीच भर दिला, असंही मुंबई इंडियन्सने स्पष्ट केलं.
'माझ्या प्रवासाचा एक खास भाग': जयवर्धने
मुंबई इंडियन्स हा गेल्या दहा वर्षांपासून माझ्या प्रवासाचा एक अतिशय खास भाग राहिला आहे, असं जयवर्धने म्हणाला. त्याने खेळाडू, सपोर्ट स्टाफ, चाहते आणि फ्रँचायझीचे मालक नीता आणि आकाश अंबानी यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. "खेळाडू, कोचिंग टीम, #OneFamily चा भक्कम पाठिंबा आणि विशेषतः चाहत्यांमुळे माझा हा अनुभव कायम लक्षात राहण्यासारखा ठरला. आपण एकत्र अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवले, आव्हानांवर मात केली आणि अभिमान वाटावा अशी कामगिरी केली. नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. मुंबई इंडियन्ससाठी माझ्या मनात नेहमीच एक खास जागा असेल. संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा," अशा भावना जयवर्धनेने व्यक्त केल्या.
मालकांकडून जयवर्धनेचं कौतुक
नीता अंबानी यांनीही जयवर्धनेच्या योगदानाचं भरभरून कौतुक केलं. त्या म्हणाल्या, "महेलाने गेल्या काही वर्षांत मुंबई इंडियन्ससाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. त्याचं शांत नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि खेळावरचं प्रेम आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. संपूर्ण MI कुटुंबाच्या वतीने मी महेलाचे आभार मानते. आपण एकत्र घालवलेले क्षण आणि आठवणी आम्ही नेहमीच जपू. महेला नेहमीच आमच्या #OneFamily चा भाग राहील. पुढच्या वाटचालीसाठी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा."
ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्सची जबाबदारी
२०२२ मध्ये महेलाने 'ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स' म्हणूनही जबाबदारी स्वीकारली होती. जगभरातील वेगवेगळ्या लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा विस्तार करण्याचं काम त्याने पाहिलं. या काळात मुंबई इंडियन्स वुमेन्स, एमआय न्यूयॉर्क आणि एमआय एमिरेट्स या तिन्ही संघांनी आपापल्या लीगमध्ये जेतेपद पटकावलं आणि फ्रँचायझीचा दबदबा जगभरात वाढवला.








