सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, गौतम गंभीर आणि झहीर खान यांना टीम इंडियातून का वगळलं, यावर माजी मुख्य निवडकर्ते संदीप पाटील यांनी मौन सोडलं आहे. देशाचं हित आणि टीमचं भविष्य लक्षात घेऊन पाच सदस्यीय निवड समितीने हे कठोर निर्णय घेतले होते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडूंची निवृत्ती आणि त्यांना टीममधून बाहेरचा रस्ता दाखवणं, यावरून नेहमीच चर्चा झडतात. आता टीम इंडियाचे माजी मुख्य निवडकर्ते संदीप पाटील यांनी सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, गौतम गंभीर आणि झहीर खान यांच्या एक्झिटवर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सचिन, युवराज, गंभीर टीममधून का बाहेर पडले? संदीप पाटील काय म्हणाले? 

संदीप पाटील २०१२ ते २०१६ या काळात भारतीय निवड समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी सांगितलं की, खेळाडूंची निवड करताना वैयक्तिक मैत्रीपेक्षा देशाच्या हिताला प्राधान्य द्यावं लागतं. पाच सदस्यांच्या निवड समितीने चर्चा करूनच हे निर्णय घेतले होते; मी एकट्याने कोणताही निर्णय घेतला नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टीमचं भविष्य सर्वात महत्त्वाचं होतं

सचिन, युवराज, गंभीर आणि झहीरसारख्या अनुभवी खेळाडूंना टीममधून बाहेर पडावं लागलं किंवा निवृत्ती घ्यावी लागली. यामागची कारणं त्या खेळाडूंनाही चांगलीच माहिती आहेत, असं पाटील म्हणाले. टीमचं भविष्य डोळ्यांसमोर ठेवून कधीकधी असे कठोर निर्णय घ्यावेच लागतात, असं त्यांचं म्हणणं आहे.

२०११ च्या वर्ल्ड कपनंतरचा बदल

२०११ चा वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघात टप्प्याटप्प्याने अनेक बदल झाले. नव्या खेळाडूंना संधी देणं आणि पुढच्या काही वर्षांसाठी टीम तयार करणं, हे निवड समितीसमोरचं मोठं आव्हान होतं. एका बाजूला सीनिअर खेळाडूंचा अनुभव आणि दुसऱ्या बाजूला भविष्यातील टीम बांधणी, असा तो समतोल साधावा लागला.

युवराज सिंग २०१७ मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला आणि २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. तर गौतम गंभीरने २०१६ मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि २०१८ मध्ये निवृत्ती घेतली. या पार्श्वभूमीवर संदीप पाटील यांचं हे वक्तव्य आता लक्ष वेधून घेत आहे.

निवडीचे निर्णय कधीच सोपे नसतात

फक्त लोकप्रिय खेळाडूंना टीममध्ये टिकवून ठेवणं, हे निवड समितीचं काम नसतं. टीमची गरज, खेळाडूंचा फॉर्म आणि भविष्यातील प्लॅनिंग या सगळ्याचा विचार त्यांना करावा लागतो. पण अशा निर्णयांमुळे अनेकदा खेळाडू आणि फॅन्स नाराज होतात.

संदीप पाटील यांच्या या वक्तव्यामुळे निवड समितीवर किती दबाव असतो, याची थोडीफार कल्पना येते. अर्थात, प्रत्येक खेळाडूच्या एक्झिटमागे एकच कारण होतं, असंही ठामपणे सांगता येणार नाही.