विनू मंकड ट्रॉफीमध्ये दिल्ली संघाचा कर्णधार आर्यवीर सेहवागने १४३ चेंडूत १७३ धावांची वादळी खेळी करत वडील वीरेंद्र सेहवागची आठवण करून दिली. याच स्पर्धेत राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविडनेही कर्नाटककडून खेळताना नाबाद ८५ धावा ठोकल्या आहेत. या स्टार किड्सच्या दमदार कामगिरीची सध्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
वीरेंद्र सेहवागचा मोठा मुलगा आर्यवीर सेहवाग आता क्रिकेटच्या मैदानात आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकत आहे. विनू मंकड एलिट स्पर्धेत दिल्ली संघाचं नेतृत्व करताना आर्यवीरने एक स्फोटक शतक झळकावलं आहे. त्याची ही तुफानी खेळी पाहून क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा 'नजफगढच्या नवाब'ची म्हणजेच वीरूची आठवण झाली.
१८ वर्षांच्या आर्यवीरने दिल्लीकडून खेळताना अवघ्या १४३ चेंडूत १९ चौकार आणि ८ गगनभेदी षटकारांच्या मदतीने १७३ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर दिल्लीने ५० षटकांत २८९ धावांचा डोंगर उभा केला. या डावात अर्णव बुग्गा याने ४७ धावा करत आर्यवीरला चांगली साथ दिली.
विशाखापट्टणममध्ये ८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या विनू मंकड स्पर्धेत आर्यवीर १६ सदस्यीय दिल्ली संघाचा कर्णधार आहे. विशेष म्हणजे, आर्यवीरने नुकतंच भारताच्या अंडर-१९ संघातही पदार्पण केलं आहे. सप्टेंबर महिन्यात राजकोटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल ठेवलं होतं.
कर्णधाराला साजेसा खेळ:
या सामन्यापूर्वी कर्नाटकविरुद्ध दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली होती. कर्नाटकने तब्बल ४१८ धावा कुटल्या होत्या. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव अवघ्या २२० धावांत आटोपला होता. त्या सामन्यात कर्णधार आर्यवीर फक्त ३२ धावा करून बाद झाला होता. पण मागच्या सामन्यातील या दारुण पराभवानंतर दिल्लीने आता जोरदार कमबॅक केलं आहे आणि आर्यवीरने कर्णधाराला साजेसा खेळ करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
याआधी ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्धच्या युथ वनडे सीरिजमध्येही आर्यवीरने तीन डावांत १०९ धावा करत आपली चुणूक दाखवली होती. एवढंच नाही तर, दिल्ली प्रीमियर लीगमध्येही तो वेस्ट दिल्ली लायन्स संघाकडून खेळताना दिसला होता.
सेहवागच्या लेकासोबत द्रविडचा मुलगाही चमकला:
विशेष म्हणजे, याच स्पर्धेत टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड यानेही आपल्या बॅटची जादू दाखवली आहे. विकेटकीपर-बॅट्समन असलेल्या अन्वयने १२ ऑक्टोबरला दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात अवघ्या ४१ चेंडूत नाबाद ८५ धावा चोपल्या. त्याच्या या खेळीमुळे कर्नाटकने दिल्लीवर १९८ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.






