भारताचा माजी क्रिकेटर अजिंक्य रहाणेने जगातल्या टॉप ५ टी-२० बॅटर्सची लिस्ट जाहीर केलीय. विशेष म्हणजे या लिस्टमध्ये त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माला जागा दिलेली नाही. त्याऐवजी जगातल्या ५ खतरनाक बॅटर्सची त्याने निवड केलीय, ज्यात फक्त एकाच भारतीय युवा खेळाडूचा समावेश आहे.

भारताचा माजी क्रिकेटर अजिंक्य रहाणेने वर्ल्ड क्रिकेटमधल्या ऑल-टाइम बेस्ट टॉप ५ टी-२० बॅटर्सची निवड केलीय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या लिस्टमध्ये दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्माला जागा मिळालेली नाही. रहाणेने फक्त एकाच भारतीय युवा खेळाडूला या लिस्टमध्ये स्थान दिलंय.

रहाणेने जाहीर केलेल्या टॉप-५ टी-२० बॅटर्सच्या लिस्टमध्ये युवा ओपनर अभिषेक शर्मा पहिल्या नंबरवर आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वात वेगाने १००० रन्स पूर्ण करण्याचा आणि २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. क्रिकबझला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत रहाणेने अभिषेकच्या खेळाचं भरभरून कौतुक केलंय. 'गेल्या एक-दोन वर्षांत अभिषेकने दाखवलेला सातत्यपूर्ण खेळ, आक्रमक स्टाईल आणि प्रगल्भता खरंच कमाल आहे,' असं रहाणे म्हणाला.

हेनरिक क्लासेन दुसऱ्या नंबरवर

दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या काही सीझन्समध्ये क्लासेनने आपली बॅटिंग स्टाईल ज्या प्रकारे सुधारली आणि कठीण परिस्थितीतून टीमला विजय मिळवून दिला, त्याचं रहाणेने कौतुक केलंय. गेल्या आयपीएल सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून चौथ्या किंवा त्याहून खालच्या नंबरवर बॅटिंग करत ६०० पेक्षा जास्त रन्स बनवण्याचा दुर्मिळ रेकॉर्डही क्लासेनच्या नावावर आहे.

खतरनाक बॅटर बटलरलाही स्थान

वेस्ट इंडिजचा डावखुरा स्फोटक बॅटर निकोलस पूरन तिसऱ्या नंबरवर आहे. स्पिनर्स आणि फास्ट बॉलर्सना सारख्याच ताकदीने खेळून कोणत्याही क्षणी मॅचचं चित्र बदलण्याची क्षमता पूरनमध्ये असल्याचं रहाणेने सांगितलं. न्यूझीलंडचा ओपनर फिन ॲलन चौथ्या स्थानावर आहे. टी-२० मध्ये सर्वात जास्त स्ट्राईक रेट असलेला दुसरा खेळाडू म्हणून ॲलन ओळखला जातो. २०२६ च्या वर्ल्ड कपमध्ये किवी टीमला फायनलमध्ये पोहोचवण्यात त्याने मोठी भूमिका बजावली होती. तर, इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन आणि ओपनर जोस बटलर पाचव्या नंबरवर आहे. इंग्लंड क्रिकेटमधल्या सर्वात खतरनाक व्हाईट-बॉल प्लेयर्सपैकी बटलर एक असल्याचं रहाणेने म्हटलंय.

रोहित-विराटला का वगळलं? फॅन्समध्ये जोरदार चर्चा!

टी-२० इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स बनवणाऱ्या आणि भारताला २०२४ चा टी-२० वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला रहाणेने पूर्णपणे डावलल्यामुळे क्रीडा वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालीय. सध्याच्या टी-२० क्रिकेटला आवश्यक असलेल्या 'अल्ट्रा-अटॅकिंग' (Ultra-attacking) स्टाईलचा विचार करूनच रहाणेने ही लिस्ट तयार केली असावी, असा अंदाज क्रिकेट एक्सपर्ट्स वर्तवत आहेत.