2026 च्या वर्ल्ड कप फायनलनंतर स्पेनच्या खेळाडूंशी मारामारी करणं अर्जेंटिनाच्या टीमला चांगलंच महागात पडलं आहे. फिफाने मुख्य आरोपी लिआंड्रो पेरेडेसवर १० मॅचची बंदी घातली असून इतर खेळाडूंवरही कारवाईचा बडगा उगारला आहे.

न्यू जर्सी : लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं, पण 2026 च्या फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये स्पेनकडून पराभव पत्करावा लागला. हा दिवस अर्जेंटिनाच्या इतिहासात दोन गोष्टींसाठी लक्षात ठेवला जाईल - एक म्हणजे त्यांचा खेळात झालेला पराभव आणि दुसरा म्हणजे खेळानंतर मैदानावर झालेला लाजिरवाणा प्रकार.

एका पिढीला आपल्या खेळाने वेड लावणारा मेस्सी जेव्हा निराश उभा होता, तेव्हा त्याच्याच टीममेट्सनी मैदानावरची सगळी सभ्यता ओलांडली. ज्या अर्जेंटिनाने वर्ल्ड कपमध्ये आपल्या खेळाने सर्वांना चकित केलं होतं, तोच संघ एका दिवसात फुटबॉल जगतासाठी 'व्हिलन' ठरला. आता या घटनेच्या एका महिन्यानंतर, फिफाने चौकशी करून कडक कारवाई केली आहे.

या कारवाईमुळे अर्जेंटिनाच्या फुटबॉल असोसिएशनला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. विशेष म्हणजे, याच फिफावर वर्ल्ड कपमध्ये मेस्सीच्या टीमसाठी पायघड्या घातल्याचा आरोप झाला होता.

कोणावर काय कारवाई झाली?

अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिआंड्रो पेरेडेसवर (Leandro Paredes) १० आंतरराष्ट्रीय सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. तर बचावपटू मोलिनावर (Molina) सात सामन्यांची बंदी आहे. दोघांनाही ९०,००० यूएस डॉलर म्हणजेच जवळपास ८६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. थियागो अल्मादा (Thiago Almada) या तिसऱ्या खेळाडूवर एका सामन्याची बंदी आहे. याशिवाय, अर्जेंटिनाच्या पुढील दोन घरगुती सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये फक्त ५० टक्के प्रेक्षकांनाच परवानगी असेल.

इंग्लंडविरुद्धच्या सेमी-फायनल विजयानंतर फॉकलँड बॅनर (Falkland banner) दाखवल्याबद्दल अर्जेंटिनाच्या फुटबॉल असोसिएशनला ३.२ लाख यूएस डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. खेळाचा वापर गैर-क्रीडा गोष्टींसाठी करणे, टीमचं गैरवर्तन आणि चाहत्यांनी केलेल्या भेदभावात्मक घोषणा या सगळ्यासाठी ही कारवाई झाली आहे. या दंडापैकी एक लाख यूएस डॉलर हे भेदभावाविरोधी कार्यासाठी वापरण्याचे निर्देश फिफाने दिले आहेत.

अर्जेंटिनाच्या कोचिंग स्टाफमधील रॉबर्ट अयाला (Robert Ayala) यांच्यावर तीन सामन्यांची बंदी आणि तीन लाख यूएस डॉलर (जवळपास २८ लाख रुपये) दंड ठोठावला आहे. स्पेनच्या टीममधील युवा खेळाडू गावी (Gavi) याच्यावरही अयालाप्रमाणेच दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

१० सामन्यांच्या बंदीमुळे पेरेडेसला जवळपास एक वर्ष अर्जेंटिनाच्या टीममधून बाहेर राहावं लागेल. या सगळ्याची सुरुवात मोलिनाच्या एका कृतीतून झाली. फायनलची शिट्टी वाजल्यानंतर, स्पेनचा कॅप्टन रॉड्रि (Rodri) आपल्या टीमसोबत आनंद साजरा करण्यासाठी धावत होता. तेव्हा मोलिनाने विनाकारण त्याला धक्का दिला. यानंतर वाद सुरू झाला. स्पेनचा खेळाडू एरिक गार्सिया (Eric Garcia) मध्यस्थीसाठी आला, पण त्याचवेळी पेरेडेसही तिथे पोहोचला.

पेरेडेस आल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली. त्यानेच स्पॅनिश खेळाडूंवर सर्वात जास्त आक्रमकपणे हल्ला केला. त्याने धावत येऊन एरिक गार्सियाला मैदानावर ढकलून दिलं. गार्सिया उठल्यावर पेरेडेसने पुन्हा त्याच्या मानेला पकडून हल्ला केला. रेफरी आणि इतर खेळाडूंनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

अर्जेंटिनाचे कोच लिओनेल स्कालोनी यांनी स्वतः येऊन गार्सियाला पेरेडेसपासून वाचवलं. त्यानंतर पेरेडेस गावीकडे वळला. त्याने गावीला अनेकदा ढकललं आणि मारलं. मोलिनाने तर गावीचा ट्रेनिंग बिब खेचून फाडला. अखेर रेफरीने पेरेडेसला रेड कार्ड दाखवून बाहेर काढल्यावरच परिस्थिती थोडी शांत झाली.

संपूर्ण सामन्यात पेरेडेस स्पॅनिश खेळाडूंशी असंच वागत होता. रेफरी स्लावको विंचिच यांनी मेस्सीला अनेकदा पेरेडेसला शांत करायला सांगितलं होतं, हे नंतर समोर आलेल्या व्हिडिओतून स्पष्ट झालं. स्पेनची टीम वर्ल्ड कप ट्रॉफी उचलत असताना अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी आणि स्टाफने पाठ फिरवून उभं राहिल्यानेही त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.

या सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाला बॉल जवळ ठेवूच दिला नाही. त्यामुळे अर्जेंटिनाने आक्रमक फाऊल करून बॉल मिळवण्याची रणनीती अवलंबली. त्यांनी एकूण २४ फाऊल केले, त्यांना ५ यलो कार्ड आणि २ रेड कार्ड मिळाले. अखेरीस, ज्या अर्जेंटिनाने फायनलपर्यंत आपल्या खेळाने मनं जिंकली होती, त्याच टीमने फायनलनंतरच्या आपल्या वागण्याने सर्वांची नाराजी ओढवून घेतली.