क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या आयुष्यावर आधारित 'कांबळी' नावाची वेब सीरिज 'झी-5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक अभिजीत देशपांडे या सीरिजचं दिग्दर्शन करत असून, यात कांबळीची क्रिकेट कारकीर्द, सुरुवातीचं यश आणि सचिन तेंडुलकरसोबतच्या मैत्रीतील चढ-उतार दाखवले जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : क्रिकेटमध्ये काही खेळाडूंच्या रेकॉर्डपेक्षा त्यांची कारकीर्दच जास्त गाजते. अशा खेळाडूंच्या यादीत क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र विनोद कांबळीचं नाव सर्वात वर येतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार पदार्पण करणाऱ्या विनोद कांबळीची गाडी नंतर मात्र घसरली. आता कांबळीचा हाच वादळी प्रवास मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'कांबळी' या नावाने त्याच्या आयुष्यावर एक वेब सीरिज येत आहे.
दिग्दर्शक अभिजीत देशपांडे २०१९ पासून या प्रोजेक्टवर काम करत आहेत. ही वेब सीरिज 'झी-5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नुकतंच या सीरिजचं पोस्टर एका युट्यूब चॅनलवर रिलीज झालं असून, क्रिकेट विश्वात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सचिनसोबतची मैत्री का तुटली? रहस्य उलगडणार?
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी किती जिगरी दोस्त होते, हे वेगळं सांगायला नको. शाळेत असताना १९८८ मध्ये हॅरिस शील्ड स्पर्धेत या दोघांनी तब्बल ६६४ धावांची नाबाद भागीदारी करून संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. दोघांनीही रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले. त्यामुळे या सर्व गोष्टी वेब सीरिजमध्ये पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे. पण बालपणापासून सचिनचा जीवलग मित्र असलेला कांबळी नंतर त्याच्यापासून दूर का गेला? या प्रश्नाचं उत्तर या सीरिजमधून मिळेल अशी चाहत्यांना आशा आहे.
सचिनच्या निवृत्तीच्या वेळी त्याने आपल्या भाषणात नाव न घेतल्याने विनोद कांबळीने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. त्यामुळे या सर्व गोष्टी दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी सीरिजमध्ये मांडल्याची शक्यता आहे.
सिनेमातही नशीब आजमावलं होतं
क्रिकेटमधून दूर झाल्यानंतर विनोद कांबळीने बॉलिवूडमध्येही आपलं नशीब आजमावलं होतं. २००० साली आलेल्या 'अनार्थ' या सिनेमात तो संजय दत्तसोबत दिसला होता. पण तिथेही त्याला फारसं यश मिळालं नाही. आता या वेब सीरिजमध्ये विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांची भूमिका कोण साकारणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.


