India vs Pakistan Asia Cup Final: पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांत पाकिस्तानने बिनबाद ४५ धावा केल्या. दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याच्या जागी रिंकू सिंगसह भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत.
दुबई: आशिया चषक फायनलमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानची चांगली सुरुवात झाली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा सहा षटकांत बिनबाद ४५ धावा केल्या होत्या. साहिबजादा फरहान (३१) आणि फखर जमान (१२) क्रीजवर आहेत. दोन षटके टाकलेल्या जसप्रीत बुमराहने १८ धावा दिल्या. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
भारतीय संघ तीन बदलांसह मैदानात
भारतीय संघ तीन बदलांसह मैदानात उतरला आहे. दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या खेळत नाहीये. त्याच्या जागी रिंकू सिंगला संघात स्थान मिळाले आहे. शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराह यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांना वगळण्यात आले आहे. पाकिस्तान संघात कोणताही बदल नाही. दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहेत.
भारत: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान: साहिबजादा फरहान, फखर जमान, सईम अयूब, सलमान आगा (कर्णधार), हुसेन तलत, मोहम्मद हॅरिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ, अबरार अहमद.
स्फोटक सुरुवात करणारा अभिषेक शर्मा दुखापतीतून सावरला ही भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. पण हार्दिकची अनुपस्थिती हे मोठे नुकसान आहे. अभिषेक आणि शुभमन गिल यांनी क्रीजवर जम बसवल्यास भारताचा विजयाचा मार्ग सोपा होईल. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांना संधीचे सोने करावे लागेल. जसप्रीत बुमराहच्या वेगवान गोलंदाजीसोबत कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांची फिरकी सामन्याची दिशा आणि निकाल ठरवेल.
आशिया चषक इतिहासातील पहिल्या भारत-पाकिस्तान फायनलसाठी आज दुबईचे मैदान सज्ज झाले आहे. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला दोनदा पराभूत केले आहे. पण अंतिम सामन्यात परिस्थिती वेगळी असेल. दोन्ही संघांवर दबाव असणार हे निश्चित आहे. जो संघ या दबावावर मात करेल, तोच चषक जिंकेल.


