India vs Pakistan Asia Cup Final: आशिया कपच्या इतिहासातील पहिल्या भारत-पाकिस्तान फायनलसाठी आज दुबईचे मैदान सज्ज झाले आहे. अपराजित राहून फायनलमध्ये पोहोचलेल्या भारताने विजेतेपद पटकावल्यास तो एक इतिहास असेल. 

दुबई: आशिया कपच्या इतिहासातील पहिल्या भारत-पाकिस्तान फायनलसाठी आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम सज्ज झाले आहे. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला दोनदा पराभूत केले आहे. पण अंतिम सामन्यात परिस्थिती बदलते. दोन्ही संघांवर दबाव असेल. जो त्यावर मात करेल तोच चषक उंचावेल. अंतिम सामन्यापूर्वी स्पर्धेतील काही रेकॉर्ड्स पाहूया.

अभिषेक शर्मा

अभिषेक शर्माने स्पर्धेत सलग तीन अर्धशतके झळकावली आहेत. आज आणखी एक अर्धशतक केल्यास, तो सलग चार टी20 अर्धशतके करणारा पहिला भारतीय ठरेल. अभिषेक व्यतिरिक्त रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी सलग तीन टी20 सामन्यांमध्ये 50+ धावा केल्या आहेत. टी20 आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी अभिषेकला फक्त 126 धावांची गरज आहे. सध्या श्रीलंकेचा पथुम निस्संका 434 धावांसह या रेकॉर्डचा मानकरी आहे. विराट कोहली 429 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.

हार्दिक पांड्या

भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला टी20 मध्ये 100 विकेट्स पूर्ण करण्यासाठी फक्त दोन विकेट्सची गरज आहे. जर त्याने या सामन्यात ही कामगिरी केली, तर अर्शदीप सिंगनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरेल.

हॅरिस रौफ

पुरुष टी20 आशिया कपमध्ये 17 विकेट्स घेणारा पाकिस्तानी वेगवान गोलंदाज सध्या सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. तो श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगासोबत पहिल्या स्थानावर आहे. आज रात्री एक विकेट घेतल्यास हॅरिसला या यादीत अव्वल स्थान गाठता येईल.

अपराजित चॅम्पियन होण्याची संधी

सहा सामन्यांत सहा विजय मिळवून भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाला स्पर्धेत अपराजित चॅम्पियन होण्याची संधी आहे.