- Home
- Mumbai
- Mumbai Local : मुंबई लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांची लोकल; विरार ते चर्चगेट प्रवास होणार अधिक सोयीस्कर
Mumbai Local : मुंबई लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांची लोकल; विरार ते चर्चगेट प्रवास होणार अधिक सोयीस्कर
Mumbai Local : पश्चिम रेल्वेने विरार ते चर्चगेट मार्गावर 15 डब्यांच्या धीम्या लोकल सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे प्रवाशांना गर्दीतून मोठा दिलासा मिळेल. पहिल्या टप्प्यात विरार ते वांद्रे दरम्यान ही सेवा सुरू होईल.

मुंबई लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी!
मुंबई : पश्चिम रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. गर्दीने हैराण झालेल्या प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार असून, विरार ते चर्चगेट मार्गावर 15 डब्यांच्या धीम्या लोकल सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.
विरार ते चर्चगेट, प्रवास अधिक आरामदायी
पश्चिम रेल्वेच्या नियोजनानुसार, पहिल्या टप्प्यात विरार ते वांद्रे दरम्यान 15 डब्यांची लोकल धावणार आहे. त्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण झाल्यावर हीच सेवा चर्चगेटपर्यंत वाढवली जाणार आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या गर्दीच्या वेळेत या लोकल्स सुरू झाल्यास प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कोंडी कमी होणार आहे.
पायाभूत सुविधांवर वेगाने काम सुरू
सध्या पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते विरार दरम्यान 15 डब्यांच्या लोकल सेवा सुरू आहेत. मात्र, चर्चगेट ते अंधेरी या मार्गावरील काही स्थानकांवर प्लॅटफॉर्मची लांबी अपुरी असल्याने हा विस्तार शक्य नव्हता. ही अडचण दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता ठोस पावले उचलली आहेत.
वांद्रे, खार रोड, सांताक्रूझ आणि विलेपार्ले या प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म लांबवणे, ओव्हरहेड वायरमध्ये सुधारणा तसेच अन्य तांत्रिक कामे सध्या सुरू आहेत. ही सर्व कामे मे–जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रवाशांच्या क्षमतेत 25 टक्क्यांची वाढ
ही कामे पूर्ण झाल्यानंतर वांद्रे ते अंधेरी दरम्यान 15 डब्यांच्या लोकल्स धावू लागतील. त्यामुळे प्रत्येक फेरीतील प्रवाशांची वहनक्षमता सुमारे 25 टक्क्यांनी वाढणार असून, गर्दीच्या वेळेत हा बदल विशेष फायदेशीर ठरणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर एकूण 211 फेऱ्या 15 डब्यांच्या लोकल्सच्या आहेत, त्यापैकी 112 फेऱ्या धीम्या मार्गावर धावत आहेत. आगामी काळात या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी होणार
ही योजना प्रत्यक्षात आल्यास मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेची बचत करणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

