- Home
- Mumbai
- पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय! 15 डब्यांची लोकल 'या' स्टेशनपर्यंत धावणार! प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय! 15 डब्यांची लोकल 'या' स्टेशनपर्यंत धावणार! प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
Mumbai Local Train Extension : चर्चगेट ते विरार दरम्यान धावणारी 15 डब्यांची लोकल सेवा एप्रिलपासून डहाणू रोडपर्यंत विस्तारली जाण्याची शक्यताय. पश्चिम रेल्वेने आवश्यक पायाभूत कामे पूर्ण केल्याने, खासदार सवरा यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला.

आता 15 डब्यांची लोकल थेट डहाणू रोडपर्यंत धावणार!
मुंबई : चर्चगेट ते विरारदरम्यान धावणाऱ्या 15 डब्यांच्या लोकलला आता डहाणू रोडपर्यंत विस्तार देण्याच्या हालचालींना वेग आला असून, एप्रिलपासून हा बदल प्रत्यक्षात लागू होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांत पश्चिम रेल्वेने महत्त्वाची पायाभूत कामे पूर्ण केल्यामुळे हा निर्णय अमलात आणणे शक्य झाले आहे. खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी लोकसभेत सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केल्याने प्रक्रियेला अधिक गती मिळाल्याचे रेल्वे सूत्रांकडून कळते.
डहाणू स्टेशनवरील अडथळे दूर
सध्या उपनगरी लोकल सेवा डहाणू येथे संपतात. मात्र फलाटांची मर्यादित लांबी 15 डब्यांच्या लोकलसाठी अपुरी पडत असल्याने विस्तार थांबला होता. आता सफाळे रेल्वे फाटकाचा अडथळा दूर झाला असून उमरोळी स्टेशनवरील फलाट रुंदीकरणही मार्गी लागले आहे. याशिवाय, डहाणू–वडोदरा इंटरसिटी एक्सप्रेस दिवसभर ज्या फलाटावर उभी केली जाते, तिला यार्डमध्ये हलवण्याची योजना आहे. त्यामुळे मोठ्या फलाटविस्ताराशिवायही 15 डब्यांची लोकल डहाणूपर्यंत नेणे शक्य होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
विरार स्टेशनमध्ये मोठे बदल, 15 डब्यांसाठी सज्ज
विरार स्थानकातील फलाट क्रमांक 5 चे सहा मीटर रुंदीकरण झपाट्याने सुरू आहे. तसेच फलाट क्रमांक 3 आणि 4 यांचेही साडेतीन मीटरने विस्ताराचे काम करण्यात येत आहे. 15 डब्यांच्या लोकलचा डहाणूपर्यंत सातत्याने विस्तार सक्षम करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पश्चिम रेल्वेकडे आवश्यक पॉईंट्स व रेक उपलब्ध असल्याने विद्यमान 12 डब्यांच्या गाड्यांना 15 डब्यांमध्ये रुपांतर करणे आता शक्य झाले आहे.
सध्या 19 लोकल सेवा, 2026 पासून आणखी वाढ
सध्या डहाणू–विरारदरम्यान दररोज दोन्ही दिशांना एकूण 19 लोकल सेवा उपलब्ध आहेत. मात्र, 2026 पासून या मार्गावर अधिक सेवा सुरू करण्याचा प्राथमिक आराखडा रेल्वेने तयार केला आहे.
प्रवाशांसाठी दिलासा, खासदार सवरा यांची मागणी
डहाणू–विरार पट्ट्यातील जवळपास अडीच लाख प्रवासी रोज लोकल सेवेवर अवलंबून आहेत. गर्दी, उष्णता आणि लांबचा प्रवास लक्षात घेता 15 डब्यांच्या तसेच वातानुकूलित लोकलची तातडीची गरज असल्याची ठोस मांडणी खासदार डॉ. सवरा यांनी संसदेत केली. शिवाय विद्यार्थ्यांपासून नोकरदार, फळ–फूल उत्पादक आणि मच्छीमारांपर्यंत सर्वांसाठी पहाटेची सेवा आवश्यक असल्याने सकाळी चारची लोकल सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या प्रस्तावित बदलांमुळे पालघर लोकसभा क्षेत्रातील लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

