नीट पेपरफुटी प्रकरण, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी ठाकरे बंधूंनी मोठी घोषणा केली आहे.
मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता महाराष्ट्रातही राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी आंदोलनासंदर्भातील अनेक मुद्दे मांडण्यात आले. याशिवाय भव्य मोर्चाचीही घोषणा करण्यात आली आहे.
शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मोर्चा
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, 26 जुलै रोजी सकाळी मुंबईतील शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिर असा मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चात विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच उद्धव ठाकरे म्हणाले, "मोर्च्याची सांगता सिद्धीविनायक मंदिरात होईल. सरकारला सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना आम्ही गणरायाच्या चरणी करणार आहोत."
‘देशभरात व्यवस्थेविरोधात संताप’
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी देशातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगितले. नीट परीक्षेतील गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप करत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. "विद्यार्थी एवढ्या मोठ्या संघर्षातून परीक्षा देतात. त्यानंतर पेपरफुटीच्या घटना घडतात. त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांमध्येच नाही तर संपूर्ण देशात व्यवस्थेविरोधात संताप आहे," असे ते म्हणाले.
‘प्रधानांच्या राजीनाम्यापलीकडे प्रश्न गेला’
राज ठाकरे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा केली. हा मुद्दा आता केवळ शिक्षणमंत्र्यांपुरता मर्यादित नाही. तो केंद्र सरकारच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी म्हटले की, "केवळ ट्विट करून प्रश्न सुटत नाही. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकायला हव्या होत्या," अशी टीका केली.
विरोधी पक्षांच्या सहभागाची शक्यता
26 जुलैच्या या मोर्चात महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांसह विविध विद्यार्थी संघटना सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील हे आंदोलन राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे ठरण्याची चिन्हे आहेत.



