Dadar Shivaji Park CJP Protest Girl Stops Police Van : शिवाजी पार्क इथून पोलीस आंदोलक तरुणांना त्यांच्या व्हॅनमधून घेऊन जात होते. याचवेळी एका तरुणीने पोलिसांची व्हॅन थांबवत आंदोलकांची सुटका केली.

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत झालेल्या आंदोलनाचे पडसाद मुंबईतही दिसत आहेत. दादर शिवाजी पार्क इथे बुधवारी तरुण आंदोलकांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी तिथे उपस्थित असेलल्या तरुणीने तिच्या कृत्याने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. शिवाजी पार्कमध्ये तरुणांकडून आंदोलन होत असताना २७ वर्षीय मॉडेल तरुणी रिया तिथे आंदोलनासाठी हजर होती. त्यावेळी पोलिसांची व्हॅन आंदोलकांना घेऊन जात होती. त्या पोलिसांच्या व्हॅनसमोर जाऊन तरुणी उभी राहिली.

नेमकं काय घडलं?

आंदोलक तरुणांना ताब्यात घेऊन त्या व्हॅनमध्ये बसवण्यात आलं होतं. त्याचवेळी रियाने कोणताही विचार न करता ती थेट आंदोलकांना ठेवलेल्या पोलिसांच्या व्हॅनसमोर जाऊन उभी राहिली. तरुणी व्हॅनसमोरुन हटतच नव्हती. बराच वेळ पोलिसांसोबत जोरदार बाचाबाचीही झाली, तरी तरुणीने व्हॅनसमोरुन हलण्यास नकार दिला. सुरुवातीला पोलिसांनी व्हॅन पुढे नेण्याचाही प्रयत्न केला, व्हॅनचा वेगही वाढवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तरुणी व्हॅनसमोरुन हटली नाही. तिने न घाबरता हे कृत्य केलं. व्हॅनमध्ये असलेल्या आंदोलनकांना सोडा अशी मागणी ती करत होती. तरुणी व्हॅन समोरुन काही केल्या हटत नव्हती. अखेर पोलिसांनी माघार घेतली आणि आंदोलकांना व्हॅनमधून सोडून दिलं. आंदोलनकांना पोलिसांनी त्यांच्या व्हॅनमधून सोडल्यानंतर सर्वांनी तिचे आभार मानले.

पोलीस आंदोलनकांना विनाकारण घेऊन जात आहेत, असं वाटलं आणि त्यामुळेच आपण हे कृत्य केल्याचं रियाने सांगितलं. पोलिसांच्या व्हॅनमध्ये खचाखच भरलेले आंदोलक आता होते. आपण चुकीचे आहोत, हे पोलिसांनीही माहिती होतं. मी पोलिसांना व्हॅनमधून आंदोलनकांना बाहेर सोडण्याचं सांगितलं. त्यावेळी पोलिसांनी काही अंतरावर त्यांना सोडून दिलं जाईल असं उत्तर दिलं. त्यावेळी तरुणीने जर तुम्हाला त्यांना सोडायचं असेल, तर आताच सोडा असं म्हणत व्हॅनसमोरच ती उभी राहिली.

आपण जे करत आहोत ते योग्य करत आहे, याची खात्री होती. भीतीपेक्षा माझा निश्चिय अधिक होता, असंही रियाने याबाबत बोलताना सांगितलं. मी जर आंदोलनासाठी निघाले आहे आणि पोलीस आंदोलकांना अशाप्रकारे घेऊन जात असतील, तर ते मला घडू द्यायचं नव्हतं. कारण त्यांना ताब्यात घेतलं तर डांबून ठेवलं जाईल आणि नंतर त्या व्हॅनमधील आंदोलकांवर एफआयआर केली जाईल, याच हेतून मी पोलिसांच्या व्हॅनसमोर जाण्यास स्वत: रोखू शकले नाही. एक नागरिक म्हणून मी काहीच करू शकले नाही, तर अपयशी ठरेन, या आंदोलनात येण्याचा उद्देशच निघून जाईल, या सर्व विचारांनीच मी तिथे व्हॅनसमोर उभी राहिली, अशी माहिती रियाने दिली.

दरम्यान, तरुणीने मोठ्या हिमतीने आंदोलनकांना घेऊन जात असलेली पोलिसांची व्हॅन अडवली. नुकसतीच व्हॅन अडवली नाही, तर आत असलेल्या आंदोलकांची सुटकाही केली. तिच्या या कृत्यांचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होत आहे. तिच्या या कृतीची एकच चर्चा होत असून या मुंबईच्या आंदोलनात तिला हिरो असंच बोललं जात आहे.