दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मुंबई : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमारानंतर राजकीय वातावरण अधिक तापले आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'एक्स'वर तीव्र शब्दांत पोस्ट केली आहे. यामधून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. यासोबत विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचाही संजय राऊतांनी निषेध केला आहे.
संजय राऊतांची सरकारवर टीका
संजय राऊत यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, “राजा, तू बंदुकीची गोळी डाग... काठीने लेकरं मरणार नाहीत”, अशा शब्दांत सरकारवर निशाणा साधला. पुढे, “राजा, तू भूक भागव त्यांच्या कोवळ्या रक्तानं... राजा, तुला लागली आहे मानवी रक्ताची चटक,” अशा ओळींचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केला.
दिल्लीतील आंदोलनानंतर देशभर संताप
दिल्लीत विद्यार्थ्यांच्या मोर्चादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आणि अश्रुधूराचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. विविध राजकीय पक्षांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा
या प्रकरणावर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि पक्षातील अन्य नेत्यांनी आंदोलनातील सीजेपीचे (CJP) प्रमुख अभिजित दीपकेंसह त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना पाठिंबा दर्शविला. या भेटीनंतर ठाकरे गटाने आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
26 जुलैच्या आंदोलनाची तयारी
दरम्यान, 26 जुलै रोजी होणाऱ्या मोठ्या आंदोलनासाठी ठाकरे गटाने तयारी सुरू केली आहे. या आंदोलनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, त्याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.


