Prakash Mahajan talk on BJP leader Pramod Mahajan death : प्रकाश महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या हत्या प्रकरणावर प्रकाश टाकला आहे. त्यांनी याला काय कारणीभूत आहे हे सांगितले आहे.

Prakash Mahajan talk on BJP leader Pramod Mahajan death : स्वर्गीय भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येमागील 'वास्तव' आणि 'षडयंत्रा'वर त्यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी सनसनाटी खुलासा केला आहे. प्रवीण महाजन केवळ पैशांसाठी आपले बंधू प्रमोद महाजन यांना ब्लॅकमेल करत होते आणि ज्या व्यक्तीमार्फत हे ब्लॅकमेलिंग चालत होते, ती व्यक्ती आजही जिवंत आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

'ब्लॅकमेलिंग' आणि हत्येचे कारण

प्रकाश महाजन यांच्या म्हणण्यानुसार, प्रमोद महाजन यांची हत्या केवळ पैशांच्या हव्यासातून आणि मत्सरातून झाली. त्यांनी ठासून सांगितले की, "प्रवीण महाजन भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करत होता. केवळ पैशांसाठी, लोभासाठी आणि स्वार्थासाठी हा खून झाला."

ब्लॅकमेलिंगचा संदर्भ देत ते म्हणाले की, "ज्या व्यक्तीच्या माध्यमातून हे ब्लॅकमेलिंग चालत होतं, तिचं नाव घेत नाही, कारण ती व्यक्ती आजही जिवंत आहे. ठाण्यातील अनेक लोकांना याची माहिती आहे." प्रवीण महाजन नोकरी न करता कंपनीकडून पगारवाढ आणि पैसे मागायचे, हाच त्यांचा उद्योग होता. "शेवटी जेव्हा मनुष्य एकटा पडतो, तेव्हा अपराधभाव आणि लोभ त्याला खातो, तसंच झालं. त्याच्या मृत्यूचं खरं कारण हाच भूतकाळ होता," असे प्रकाश महाजन म्हणाले.

मुंडे कुटुंब आणि जमिनीचा वाद

प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसावरून पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर प्रकाश महाजन यांनी सारंगी महाजन यांच्यावरही तीव्र शब्दांत प्रहार केला. गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण आणि सारंगी यांच्या नावावर विश्वास ठेवून जमीन घेतली होती. या जमिनीवरूनच आज पंकजा मुंडेंवर डाग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रकाश महाजन यांनी खुलासा केला की, गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्याविरोधात साक्ष दिली होती. तेव्हापासून वैर पेटले आणि आज होणारी बदनामी त्याच वैराची सावली आहे.

सारंगी महाजन यांच्यावर कठोर टीका:

पंकजा मुंडे यांच्यावर 'बिघडलेली मुलगी' अशी टीका करणाऱ्या सारंगी महाजन यांना प्रकाश महाजन यांनी 'लाज वाटत नाही का?' असा संतप्त सवाल केला. ते म्हणाले, "वडील गेल्यावर त्या मुलीवर (पंकजा) किती संकटं आली हे मला ठाऊक आहे. केवळ स्वार्थासाठी तुम्ही तिच्यावर बोट ठेवता?" तसेच, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे तुम्हाला ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेचा व्हिसा मिळाला, त्यावेळी हे दोन्ही नेते चालत होते; मग आज त्यांच्या मुलीची बदनामी करताना लाज कशी वाटत नाही, अशी विचारणा त्यांनी केली.

प्रकाश महाजन यांनी सारंगी महाजन यांच्यावर बदनामीचा धंदा करत असल्याचा आरोप केला. त्यांचा नवरा काम करत नसतानाही फोंडांसारखा महागडा वकील कसा परवडला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. "तुम्ही इतरांच्या चरित्रावर चिखलफेक करता आणि ज्याची लाज वाटली पाहिजे, त्याचाच अभिमान बाळगता," असे प्रकाश महाजन म्हणाले.