Mumbai Water Cut News : मुंबईत मेट्रो लाईन 7 अ प्रकल्पाच्या कामामुळे मुख्य जलवाहिनी वळवण्यात येत आहे. या कामासाठी, २० ते २२ जानेवारी २०२६ दरम्यान तब्बल ४४ तास शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद किंवा कमी दाबाने राहणार आहे.
मुंबई : मुंबईत राहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. येत्या काही दिवसांत मुंबईतील विविध भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद किंवा कमी दाबाने केला जाणार असून, त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
मेट्रो प्रकल्पामुळे जलवाहिनीचे काम
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) अंतर्गत सुरू असलेल्या मेट्रो लाईन 7 अ प्रकल्पासाठी मुख्य जलवाहिनी वळविण्याचे काम सुरू आहे. या वळविण्यात आलेल्या जलवाहिनीची छेद-जोडणी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून के पूर्व विभागात केली जाणार आहे. हे काम मंगळवार, 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजेपासून गुरुवार, 22 जानेवारी 2026 रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत, म्हणजेच तब्बल 44 तास चालणार आहे. या कालावधीत मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.
‘या’ विभागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम
या दुरुस्ती व जोडणीच्या कामामुळे जी उत्तर, के पूर्व, एस, एच पूर्व आणि एन विभागांतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे, तर काही ठिकाणी ठराविक वेळेतच कमी दाबाने पाणी मिळणार आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकातही बदल होणार आहे.
जी उत्तर विभाग (धारावी परिसर) : सकाळी व सायंकाळी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने.
के पूर्व विभाग : मरोळ, अंधेरी, सिप्झ, विमानतळ परिसर व काही वसाहतींमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
एस विभाग : विक्रोळी व भांडुप पश्चिम भागातील अनेक वसाहतींमध्ये कमी दाबाने किंवा बंद पाणीपुरवठा.
एच पूर्व विभाग : संपूर्ण वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) परिसरात रात्रीच्या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा.
एन विभाग : विक्रोळी पश्चिम व घाटकोपर परिसरातील काही गृहसंकुलांमध्ये ठराविक वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा.
महापालिकेचे नागरिकांना आवाहन
मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना आधीच आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीच्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच पुढील काही दिवस पाणी उकळून व गाळून पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या या कामासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


