Mumbai Water Cut : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठा झपाट्याने घटल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने १५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या उष्णतेमुळे जलाशयांमधील बाष्पीभवन वाढत असून, भारतीय हवामान विभागाने यंदा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

जलाशयांमध्ये फक्त २३.५२ टक्के पाणीसाठा शिल्लक
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, ११ मेपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये केवळ ३,४०,३९९ दशलक्ष लिटर वापरण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे. वार्षिक क्षमतेच्या तुलनेत हा साठा केवळ २३.५२ टक्के इतकाच उरला आहे. त्यामुळे आगामी काही महिने लक्षात घेता पाणी बचतीचे उपाय तातडीने राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
ठाणे, भिवंडी-निजामपूरलाही फटका
मुंबईसह ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आणि बीएमसीकडून पाणीपुरवठा होणाऱ्या इतर गावांमध्येही १० टक्के कपात लागू करण्यात येणार आहे. ही कपात समाधानकारक पाऊस पडून जलाशय पुन्हा भरत नाहीत तोपर्यंत कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अतिरिक्त पाणीसाठ्याचीही व्यवस्था
बीएमसीच्या माहितीनुसार, मुंबईला भातसा धरणातून १,४७,०९२ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच अप्पर वैतरणा धरणातूनही ९०,००० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. मात्र वाढते तापमान आणि बाष्पीभवन लक्षात घेता ही व्यवस्था पुरेशी ठरणार नाही, अशी भीती प्रशासनाला आहे.
नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन
पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर बीएमसीने नागरिकांना पाण्याचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. अंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीचा वापर करावा, दात घासताना नळ चालू ठेवू नये, वाहन धुण्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि घरातील गळती तातडीने दुरुस्त करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
गळती रोखा, पाणी वाचवा
बीएमसीने सर्व गृहनिर्माण संस्था आणि घरांमधील पाणीपुरवठा यंत्रणा तपासण्याचे आवाहन केले आहे. पाइपलाइन किंवा नळांमधील गळती तातडीने दुरुस्त केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. तसेच त्यामुळे जलप्रदूषण टाळण्यासही मदत होईल, असे प्रशासनाने सांगितले.


