Ladki Bahin Yojana Amount Recover : लाडकी बहीण योजनेचा ज्या सरकारी कर्मचारी आणि पुरुषांनी लाभ घेतला आहे, त्या सर्वांकडून पैसे वसूल केले जाणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.
मुंबई : राज्यात लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. २८ जून २०२४ रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेला यंदा जून २०२६ मध्ये दोन वर्ष पूर्ण झाली. दर महिन्याला १५०० रुपये मिळणाऱ्या या योजनेत लाखो महिला लाभार्थी आहेत. मात्र महिलांसाठी असलेल्या या योजनेत अनेक पुरुषांनीही लाभ घेतल्याचा प्रकार समोर आला. या पुरुषांना योजनेतून वगळण्यात आलं. मात्र आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून त्यांनी घेतलेली १५०० रुपयांची रक्कम परत घेण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

पुरुष, सराकरी कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही दिवसांपूर्वी ज्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील, यासाठी प्रक्रिया सुरू करणार आहे असं सांगितलं असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या. त्याशिवाय ज्या शासकीय महिलांनी, सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडून पैसे परत घेण्यासाठी मागील ८ ते १० महिन्यांपूर्वीच प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहितीही अदिती तटकरे यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजना दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आली, त्यावेळी काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांहून अधिक नसावं, २१ ते ६५ वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र होत्या. सरकारी कर्मचारी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, असं सांगण्यात आलं होतं. मात्र या योजनेसाठी अनेक अपात्र महिलांनी अर्ज केला. सरकारी खात्यात काम करणाऱ्या महिलांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. इतकंच काय तर, महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ पुरुषांनीही घेतला. अशा अनेक बाबी समोर आल्यानंतर सरकारने अपात्र महिला, पुरुषांना या योजनेतून वगळलं.
या महिलांना दिलासा
ज्या अपत्रा महिलांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांना योजनेतून काढून टाकलं. मात्र त्यांच्याकडून त्यांनी घेतलेले १५०० रुपये वसूल केले जाणार नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र ज्या सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी आणि इतर कोणत्याही पुरुषाने या योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्यांच्याकडून आता पैसे वसूल केले जाणार आहेत.


