मुंबईत पुढील ४८ तासांसाठी हवामान खात्याने महत्त्वाची शक्यता वर्तवली आहे. IMD कडून मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रासाठी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. राज्यातील काही भागात ऑरेंज, तर काही भागात यलो अलर्ट दिला आहे.
मुंबई : सोमवारपासून मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आणि पावसाला सुरूवात झाली. तर मंगळवारी अखेर नैऋत्य मोसमी पाऊस मान्सून मुंबईत दाखल झाला. पावसाच्या पार्श्वभूमीवर आता हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून पुढील ४८ तासांत तो मुंबईत पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान विभाग अर्थात IMD ने सोमवारी वर्तवली आहे.

पुढील ४८ तासांत मान्सून मुंबईत - IMD
महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय होत असून पुढील ४८ तासांत मान्सून मुंबईपर्यंत पोहोचण्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. नैऋत्य मान्सूनच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबईत सोमवारी सकाळी ६ ते ७ या वेळेत १७ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. तर पश्चिम उपनगरांमध्ये १० मिमी पाऊस झाला. याच वेळेत सोमवारी पूर्व उपनगरांमध्ये पावसाची कोणतीही नोंद झालेली नाही.
महाराष्ट्रात कुठे ऑरेंज, तर कुठे यलो अलर्ट
मुंबईत मुसळधार पावसाच्या इशाऱ्यासह रायगड, पुणे, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठीही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता, तर ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत येलो अलर्ट देण्यात आला होता.
मंगळवारी हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात त्यानंतर पुढे तेलंगणा, ओडिशा, बिहार, झारखंड या भागामध्ये पुढे सरकत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने मुंबई-महाराष्ट्रात पावसाच्या अलर्टसह विविध राज्यातील पावसाच्या शक्यतेबाबतही सांगितलं आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पुढे सरकरण्यासाठी चांगली अनुकूल परिस्थिती असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर पुढील तीन-चार दिवसांत उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

