नाशिक-मुंबई प्रवास सुसाट! 4,500 कोटींचा रेल्वे प्लॅन मंजूर; आता लोकल धावणार थेट नाशिकला
Mumbai Local : रेल्वे मंत्रालयाने कसारा ते मनमाड दरम्यानच्या १३१ किलोमीटरच्या समांतर रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. या ४,५०० कोटींच्या प्रकल्पामुळे कसारा घाटातील वेळ वाचणार असून, मुंबई-नाशिक थेट लोकल सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक-मुंबई प्रवास सुसाट! 4,500 कोटींचा रेल्वे प्लॅन मंजूर
नाशिक/मुंबई : नाशिककरांचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी 'लोकल' आता थेट नाशिकपर्यंत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वे मंत्रालयाने कसारा ते मनमाड दरम्यानच्या १३१ किलोमीटरच्या समांतर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील दाखवला असून, या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्राच्या दळणवळणात मोठी क्रांती होणार आहे.
कसारा घाटातील वेळेचा खोळंबा संपणार!
सध्या कसारा घाटात असलेल्या तीव्र चढणीमुळे गाड्यांना अतिरिक्त इंजिन (बँकर्स) लावावे लागतात. यात प्रवाशांचा मोलाचा वेळ वाया जातो. मात्र, नव्या प्रकल्पामुळे हे चित्र बदलणार आहे.
नवे १८ बोगदे: घाटात दोन नवीन रेल्वे मार्ग टाकले जाणार असून त्यात तब्बल १८ बोगद्यांचा समावेश असेल.
विना-बँकर प्रवास: चढाईची उंची कमी केल्यामुळे आता गाड्यांना जादा इंजिनची गरज भासणार नाही.
४५ मिनिटांची बचत: घाट ओलांडताना होणारी ओढाताण थांबल्यामुळे प्रवासाचा वेळ किमान ३० ते ४५ मिनिटांनी कमी होईल.
४,५०० कोटींची गुंतवणूक आणि प्रकल्पाचा विस्तार
मध्य रेल्वेवरील मुंबई ते भुसावळ हा मार्ग अतिशय गजबजलेला आहे. या मार्गावरील ताण हलका करण्यासाठी केंद्र सरकार ४,५०० कोटी रुपये खर्च करणार आहे. कल्याण-कसारा आणि मनमाड-भुसावळ दरम्यान आधीच तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचे काम सुरू आहे. आता कसारा-मनमाड हा दुवा जोडला गेल्याने संपूर्ण मार्गिका पूर्ण होईल.
भूसंपादनाचे काम युद्धपातळीवर
राज्य सरकारने या प्रकल्पासाठी जमिनीच्या संपादनाचे अधिकृत राजपत्र (Gazette) प्रसिद्ध केले आहे. नाशिक जिल्ह्यातील खालील गावांतून हा मार्ग जाणार आहे.
प्रमुख गावे: भगूर, वंजारवाडी, देवळाली, संसरी, विहितगाव, एकलहरे, माडसांगवी, शिलापूर, ओढा, लाखलगाव, आणि सिद्ध पिंप्री.
या 'गेमचेंजर' निर्णयाचे ३ मोठे फायदे
१. थेट लोकल सेवा: स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्यामुळे मुंबई-नाशिक लोकल चालवणे आता तांत्रिकदृष्ट्या शक्य होणार आहे.
२. मेल-एक्स्प्रेसचा वेग वाढणार: लांब पल्ल्याच्या गाड्यांना आता घाटात ताटकळत उभे राहावे लागणार नाही.
३. औद्योगिक विकास: मालवाहतूक सुलभ झाल्यामुळे नाशिक आणि आसपासच्या उद्योगांना मोठी गती मिळेल.

