मुंबईत उन्हाचा पारा वाढत असताना प्रवासी एसी लोकलकडे वळताना दिसत आहेत. विलंबाने धावत असूनही एसी लोकलने प्रवास करण्यासाठी अनेक प्रवासी फलाटावर थांबणे पसंत करत आहेत.

Mumbai AC Local : मुंबईमध्ये उन्हाची तीव्रता वाढत असताना रेल्वे प्रवाशांचा कल वातानुकूलित (एसी) लोकलकडे वाढताना दिसत आहे. प्रचंड उकाड्यापासून बचाव करण्यासाठी प्रवासी एसी लोकलची वाट पाहण्यासही तयार आहेत. मात्र या वाढत्या मागणीमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढल्याचे चित्र समोर आले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने याबाबत मोठ्या प्रमाणात कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला आहे. याबद्दलची माहिती महाराष्ट्र टाइम्स यांनी दिली आहे. 

‘वाट पाहीन, पण एसी लोकलनेच जाईन’

होळीनंतर तापमान वाढू लागल्याने त्याचा परिणाम आता लोकल प्रवासावरही दिसू लागला आहे. दुपारच्या वेळेत प्रखर उन्हाचा सामना करत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे अनेक प्रवासी एसी लोकलची वाट पाहण्यास तयार आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गासोबत आता हार्बर मार्गावरही एसी लोकल धावू लागल्या आहेत. मात्र काही गाड्या विलंबाने धावत असतानाही प्रवासी “वाट पाहीन, पण एसी लोकलनेच जाईन” असे म्हणत वातानुकूलित गाडीला पसंती देत आहेत.

मध्य रेल्वेवर मोठ्या प्रमाणात कारवाई

सेंट्रल रेल्वेवर एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज सरासरी ४०१ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यामधून दररोज सरासरी १.२७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आतापर्यंत एकूण १.१० लाख प्रवाशांकडून सुमारे ३.५१ कोटी रुपयांचा दंड वसूल झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ८९,७९९ विनातिकीट प्रवासी सापडले होते. त्यामुळे यंदा अशा प्रवाशांमध्ये २३ टक्क्यांनी वाढ झाली असून दंडाच्या रकमेतही १८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

पश्चिम रेल्वेवरही मोठा दंड

दरम्यान पश्चिम रेल्वेवर एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या एक लाख १६ हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ३.७६ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.