गेल्या आठ तासांपासून मध्य आणि हार्बल लोकल सेवा बंद असल्याने मुंबईकर मोनोरेलकडे पर्यायी मार्ग म्हणून बघत होते. पण आता मोनोरेलही खोळंबली होती. श्वास गुदमरल्याने प्रवाशांनी खिडकीची काच फोडली.

मुंबई : मुंबईकरांना पुन्हा एकदा मोनोरेल सेवेत अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज सायंकाळी भक्ती पार्कजवळ मोनोरेलमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवासी जवळपास दोन तासांपासून अडकले होते. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, प्रवाशांना रेस्क्यू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. श्वास गुदमरल्याने प्रवासांनी खिडकीची काच फोडली होती. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या शिड्यांवरुन प्रवाशांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भक्ती पार्क व मैसूर कॉलनी स्थानकाच्या दरम्यान मोनोरेल अचानक थांबली. प्रवाशांची संख्या जास्त झाल्याने मोनोरेल पुढे जाऊ शकली नाही. या वेळी गाडीत शेकडो प्रवासी प्रवास करत होते. मोनोरेलचा एसीही बंद असल्याने प्रवाशांना गुदमरल्यासारखे झाले होते. त्यामुळे काहींना चक्कर आल्याचेही सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू करण्यात आले. अग्निशमन दल व मोनोरेल प्रशासनाचे कर्मचारी मिळून लोकांना बाहेर काढले.

विशेष म्हणजे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे ठप्प पडल्याने मुंबईकरांनी मोनोरेलचा आधार घेतला होता. पण आता मोनोरेलही थांबल्याने दोन्ही प्रमुख प्रवासी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.

दरम्यान, मोनोरेल प्रशासनाने सांगितले की, "जास्त प्रवाशांमुळे गाडी थांबली असून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात येत आहे. लवकरच तांत्रिक तपासणीचे काम पूर्ण करून सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल." मात्र वारंवार होणाऱ्या अशा खोळंब्यामुळे मोनोरेलच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रवाशांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, “मोनोरेल ही उपयोगी सेवा म्हणून आम्ही स्वीकारली, परंतु वारंवार होणाऱ्या अडचणींमुळे आमचा जीव धोक्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने योग्य व्यवस्था करावी.”