- Home
- Mumbai
- Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो, पुढील तीन तास अत्यंत निर्णायक; शहरात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो, पुढील तीन तास अत्यंत निर्णायक; शहरात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी
Mumbai Rain Updates: मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मिठी नदी धोक्याच्या पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. रेल्वे सेवाही ठप्प झाली आहे.

मुंबई : मुंबई आणि उपनगरांत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले असून, मुंबईची अक्षरशः तुंबई झाली आहे. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर
जोरदार पावसामुळे मिठी नदीची पातळी 3.9 मीटरपर्यंत वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. कुर्ला येथील क्रांतीनगर परिसरातील सुमारे 350 नागरिकांना जवळच्या मगनदास मथुराम मनपा शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. या नागरिकांच्या जेवणाची आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था मुंबई महानगरपालिकेने केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मिठी नदी परिसराची पाहणी केली आहे. मुंबई पोलिसांनी मिठी नदीलगत राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे.
रेल्वे सेवा ठप्प
मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी रेल्वे सेवाही या पावसामुळे ठप्प झाली आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे, तर पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. ठाण्यापर्यंतच रेल्वेसेवा सुरू असून, विरार आणि वसईदरम्यान लोकल गाड्या बंद आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत सेवा पूर्ववत होणार नाही.
रायगड, पुणे आणि नाशिकमधील घाट परिसरातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

