- Home
- Mumbai
- Mumbai Rains : मध्य आणि हार्बर लोकल सेवा ठप्पच! स्टेशनवर प्रवाशांची गर्दी, थांबायलाही जागा नाही
Mumbai Rains : मध्य आणि हार्बर लोकल सेवा ठप्पच! स्टेशनवर प्रवाशांची गर्दी, थांबायलाही जागा नाही
मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने गाड्या थांबवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे लाखो प्रवाशांचे हाल होत असून, प्रवास पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.

भारतीय हवामान खात्याने मुंबई शहर व उपनगरांसाठी रेड अलर्ट जाहीर केला होता. रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस सकाळी अधिक तीव्र झाला. सायन, कुर्ला, चेंबूर, वडाळा, भांडुप, मुलुंड, ठाणे या ठिकाणी रेल्वे रुळांवर गुडघाभर पाणी साचले. यामुळे मध्य व हार्बर मार्गावरील सर्व गाड्या तात्पुरत्या थांबविण्यात आल्या होत्या. परंतु, ८ तासांनीही सेवा सुरु झालेली नाही.
रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही पावले उचलावी लागली. पाणी ओसरताच दुरुस्ती व देखभाल पथके तातडीने कामाला लागतील. सायंकाळी कार्यालयांना सुटी झाल्यानंतरही सेवा सुधारलेली नाही. अद्यापही ती बंदच आहे.
यामुळे मुंबईत लोकल रेल्वेवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. कामावर जाणाऱ्या कर्मचारी वर्गाला पर्यायी मार्ग शोधावे लागले. बेस्टच्या बस मार्गांवर प्रचंड गर्दी झाली असून, रस्त्यावरही वाहतूक कोंडीचे चित्र दिसले. अनेक प्रवाशांनी प्रवास रद्द करून घरी परतण्याचा निर्णय घेतला.
पश्चिम रेल्वेवरही पावसाचा परिणाम दिसून आला असला तरी, काही गाड्या विलंबाने धावत आहेत. मात्र मध्य व हार्बर मार्गावरील परिस्थिती गंभीर आहे. हार्बर लाईनवरील वाशी, नेरुळ, पनवेल या भागांत मुसळधार पावसामुळे पाणी तुंबले आहे. त्यामुळे हार्बर रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अत्यावश्यक कारणांशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच अधिकृत ट्विटर हँडल आणि हेल्पलाइन क्रमांकावरून सतत अद्ययावत माहिती दिली जात आहे. स्थानकांवर प्रवाशांना पिण्याचे पाणी आणि आवश्यक मदत पुरवली जात आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेने नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे. पाण्यातून वाहन चालवू नये, पाणी साचलेल्या ठिकाणी विद्युत उपकरणांचा वापर करू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. पावसाळ्यात वारंवार अशी परिस्थिती निर्माण होत असून, पायाभूत सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पाणी तुंबण्याची समस्या सुटत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

