Mumbai Metro Update : मुंबई महापालिका निवडणुका पार पडताच मेट्रो 2B आणि मेट्रो 9 सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रजासत्ताक दिनी दहिसर ते सुभाष चंद्र बोस स्टेडियम हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता
Mumbai Metro Update : मुंबईत मेट्रोचं जाळं झपाट्यानं विस्तारत असताना प्रवाशांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबई महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर रखडलेले मेट्रो प्रकल्प पुन्हा मार्गी लागले असून, मेट्रो 2B आणि मेट्रो 9 या महत्त्वाच्या मार्गिका लवकरच प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईकरांना ही खास भेट मिळू शकते.
निवडणुकीमुळे रखडलेलं उद्घाटन
गेल्या काही महिन्यांपासून महापालिका निवडणुका पूर्ण झाल्यानंतर मेट्रो 2B आणि मेट्रो 9 सुरू केल्या जातील, असं MMRDA कडून सांगण्यात येत होतं. मंडाळे ते डायमंड गार्डन जोडणारी मेट्रो 2B आणि दहिसर ते काशिगाव जोडणारी मेट्रो 9 या मार्गिकांचं उद्घाटन डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होतं. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
निवडणुकांनंतर मेट्रो सुरू होण्याचा मार्ग मोकळा
आता निवडणुका पार पडल्याने मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे. दहिसर ते सुभाष चंद्र बोस स्टेडियम जोडणाऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून, हा टप्पा 26 जानेवारी रोजी प्रवाशांसाठी सुरू होण्याची दाट शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
चाचणी पूर्ण, CMRS प्रमाणपत्राची प्रतीक्षा
डिसेंबर महिन्यात या मेट्रो मार्गिकेची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. चाचणीदरम्यान आढळलेल्या काही त्रुटींवर MMRDA ला सूचना देण्यात आल्या होत्या. त्या त्रुटी दूर करण्यात आल्याचं सांगण्यात येत असून, आता केवळ CMRS (Commissioner of Metro Railway Safety) कडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळणं बाकी आहे. येत्या आठवड्यात हे प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता असून, त्यानंतर 4.4 किमी लांबीचा टप्पा सुरू केला जाईल.
मेट्रो 9 चा पहिला टप्पा कसा असेल?
मेट्रो लाईन 9 ची एकूण लांबी 13.5 किमी आहे. सध्या या मार्गिकेचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशीगाव अशी चार स्थानकं असतील.
पश्चिम उपनगरांना मोठा दिलासा
मेट्रो 9 आणि मेट्रो 7A पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 पासून थेट मिरा-भाईंदरपर्यंत अखंड मेट्रो कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान, सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.


