- Home
- Mumbai
- Mumbai Metro Ganeshotsav Timetable : गणेशोत्सवात मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, आता मध्यरात्रीपर्यंत धावणार मेट्रो!
Mumbai Metro Ganeshotsav Timetable : गणेशोत्सवात मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, आता मध्यरात्रीपर्यंत धावणार मेट्रो!
Mumbai Metro Ganeshotsav Timetable : मुंबईतील गणेशोत्सवात भाविकांच्या सोयीसाठी MMRDA ने मेट्रो २ए आणि ७ रात्री १२ वाजेपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान उपलब्ध असेल आठवड्याच्या दिवसांनुसार फेऱ्या वाढवल्या जातील

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या धामधुमीत प्रवासाची चिंता आता मिटणार आहे! मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) भाविकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता मेट्रो लाईन २ए (अंधेरी पश्चिम–दहिसर) आणि लाईन ७ (गुंदवली–दहिसर) वरील गाड्या रात्री ११ ऐवजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत धावणार आहेत. ही विशेष सेवा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या ११ दिवसांसाठी उपलब्ध असेल.
प्रवाशांसाठी अधिक फेऱ्या, अधिक सुविधा
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत लाखो भाविक विविध गणेश मंडळांना भेट देतात. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. या गर्दीतून सुटका मिळवण्यासाठी मेट्रो हा सर्वात जलद आणि सुरक्षित पर्याय ठरतो. त्यामुळे भाविकांना रात्री उशिरापर्यंत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाता यावे, यासाठी MMRDA ने मेट्रो फेऱ्या वाढवल्या आहेत.
टाईमटेबल जाणून घ्या
आठवड्याच्या दिवसांमध्ये (सोमवार-शुक्रवार)
एकूण ३१७ फेऱ्या चालवल्या जातील, ज्यात १२ फेऱ्यांची वाढ झाली आहे. गर्दीच्या वेळेत दर ५ मिनिटे ५० सेकंदांनी आणि इतर वेळेत दर ९ मिनिटे ३० सेकंदांनी गाडी उपलब्ध असेल.
शनिवारी
१२ फेऱ्या वाढवून एकूण २५६ फेऱ्या होतील. गर्दीच्या वेळेत दर ८ मिनिटांनी, तर इतर वेळेत दर १० मिनिटे २५ सेकंदांनी गाडी धावेल.
रविवारी
एकूण २२९ फेऱ्या असतील, म्हणजे १२ फेऱ्यांची वाढ. या दिवशी प्रत्येक १० मिनिटांनी मेट्रो मिळेल.
याव्यतिरिक्त, प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त फेऱ्याही चालवल्या जातील.
उत्सवाचा आनंद सुरक्षित प्रवासासह
या निर्णयाबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. या काळात मुंबईभर प्रवास करणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित प्रवास देणे ही आमची जबाबदारी आहे. मेट्रो सेवा वाढवल्यामुळे त्यांना शहराच्या कानाकोपऱ्यातील मंडळांना सहज भेट देता येईल.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले, "गणेशोत्सव मुंबईकरांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. मेट्रो सेवा मध्यरात्रीपर्यंत वाढवल्याने नागरिक कोणत्याही चिंतेशिवाय उत्सवाचा आनंद घेऊ शकतील." वाढलेल्या मेट्रो सेवांमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत होणार असून, मुंबईकरांचा प्रवास अधिक सोयीचा आणि सुरक्षित होईल.

