- Home
- Mumbai
- Metro Line 3 : मतदानाच्या दिवशी मुंबईकरांना मोठा दिलासा; ‘अॅक्वा लाईन’ मध्यरात्रीपर्यंत धावणार, पाहा वेळापत्रक
Metro Line 3 : मतदानाच्या दिवशी मुंबईकरांना मोठा दिलासा; ‘अॅक्वा लाईन’ मध्यरात्रीपर्यंत धावणार, पाहा वेळापत्रक
Mumbai Metro-3 : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दिवशी मुंबई मेट्रो-3 (अॅक्वा लाईन) विशेष अतिरिक्त सेवा देणारय. निवडणूक कर्मचारी, मुंबईकरांच्या सोयीसाठी ही मेट्रो सेवा पहाटे ५ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अतिरिक्त फेऱ्यांसह चालवली जाईल

मतदानाच्या दिवशी मुंबईकरांना मोठा दिलासा
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान अधिकारी, कर्मचारी आणि मुंबईकरांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो-3 अर्थात ‘अॅक्वा लाईन’ विशेष सेवा देणार आहे. मतदानाच्या दिवशी मेट्रो 3 च्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार असून ही सेवा पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत उपलब्ध असणार आहे.
मुंबई मेट्रो प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय
15 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेचे मतदान होणार असून सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर मतमोजणी 16 जानेवारी रोजी होणार आहे. या काळात निवडणूक ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वेळेत मतदान केंद्रांवर पोहोचता यावे, यासाठी मुंबई मेट्रो प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पहाटे 5 पासून ते रात्री 12 पर्यंत मेट्रो सेवा
मतदानाच्या दिवशी मेट्रो-3 सेवा पहाटे 5.00 वाजल्यापासून सुरू होणार असून रात्री 12.00 वाजेपर्यंत मेट्रो धावणार आहे. विशेषतः उशिरापर्यंत काम करणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार आहे. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये एकाच दिवशी निवडणूक होत असून त्यात मुंबईचा समावेश आहे.
सामान्य प्रवाशांनाही होणार फायदा
या विशेष अतिरिक्त फेऱ्यांमुळे केवळ निवडणूक कर्मचारीच नव्हे, तर सामान्य मुंबईकरांचा प्रवासही अधिक सुलभ होणार आहे. आरे ते कफ परेड दरम्यान धावणारी ‘अॅक्वा लाईन’ गेल्या तीन महिन्यांपासून पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे आणि प्रवाशांचा वाढता प्रतिसाद तिला मिळत आहे.
मतदानाच्या दिवशी मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार
ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत मेट्रो-3 मधून तब्बल 1 कोटी 29 लाख 78 हजार 262 प्रवाशांनी प्रवास केला आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत हा आकडा केवळ 19 लाख 70 हजार इतकाच होता. विशेष म्हणजे, ऑक्टोबर 2025 मध्येच 38 लाख 63 हजार 741 प्रवाशांनी मेट्रो-3 चा वापर केला. मतदानाच्या दिवशी दिल्या जाणाऱ्या या विशेष सेवेमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असल्याचे चित्र आहे.

