मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, १४ ते १७ जानेवारी दरम्यान वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. दादर, वरळी आणि सांताक्रूझमधील अनेक महत्त्वाचे रस्ते बंद राहणार असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई : उद्या राजयातील २९ महानगरपालिकांसाठी, विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे आणि कल्याण-डोंबिवलीत मतदानाचा बिगुल वाजणार आहे. या लोकशाहीच्या उत्सवात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये आणि सुरक्षा व्यवस्था चोख राहावी, यासाठी मुंबई पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या मार्गांवर निर्बंध लादले आहेत. आज, १४ जानेवारीपासून १७ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
वाहतुकीचे निर्बंध आणि कालावधी
मुंबईतील दादर, वरळी आणि सांताक्रूझ यांसारख्या प्रमुख भागांत १४ जानेवारी सकाळी ८ वाजेपासून ते शनिवार, १७ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत हे बदल लागू राहतील.
कुठे असेल बंदी आणि काय आहेत पर्यायी मार्ग?
१. दादर (पश्चिम) परिसर
बंद रस्ते: राव बहादूर एस.के. बोले मार्ग, अशोक वृक्ष रोड आणि रानडे रोड.
कालावधी: १४ जानेवारी सकाळी ८ ते १६ जानेवारी रात्री ११ पर्यंत.
नियम: येथे सामान्य नागरिकांच्या वाहनांना प्रवेश आणि पार्किंगला मनाई आहे. फक्त रहिवासी आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना परवानगी असेल.
२. वरळी परिसर
ई. मोझेस रोड: १६ जानेवारी रोजी (मतमोजणीच्या दिवशी) सकाळी ५ ते मध्यरात्रीपर्यंत प्रवेश आणि पार्किंग बंद. महापालिकेच्या अभियांत्रिकी केंद्रात स्ट्राँग रूम असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे.
जी.एम. भोसले मार्ग: ईव्हीएम मशिनच्या वितरणामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवार मध्यरात्रीपर्यंत वाहतूक विस्कळीत राहू शकते. प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
३. पश्चिम उपनगरे (सांताक्रूझ)
एनएस रोड क्रमांक ६ आणि टीपीएस रोड क्रमांक ३: गुरुवारी मतदानामुळे हे रस्ते तात्पुरते बंद राहतील.
रिलीफ रोड (सांताक्रूझ): शुक्रवारी मतमोजणी प्रक्रियेमुळे हा रस्ता पूर्णपणे बंद असेल.
सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त
मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात २८,००० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यात ३,००० अधिकारी आणि २५,००० जवानांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त
राज्य राखीव पोलीस दल (SRPF)
जलद प्रतिसाद पथक (QRT)
बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS)
होमगार्ड्स
नागरिकांसाठी आवाहन
निवडणूक काळात पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी १०० किंवा ११२ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.


