- Home
- Mumbai
- दिलासादायक अपडेट! कल्याण–पेंधर मेट्रो मार्गिका 12 ला गती, सुरूवातीची तारीख कधी? जाणून घ्या सविस्तर
दिलासादायक अपडेट! कल्याण–पेंधर मेट्रो मार्गिका 12 ला गती, सुरूवातीची तारीख कधी? जाणून घ्या सविस्तर
कल्याण ते पेंधर (नवी मुंबई) मेट्रो मार्गिका क्रमांक 12 च्या कामाला वेग आला असून, डोंबिवली एमआयडीसीजवळ 100वा गर्डर यशस्वीपणे उभारण्यात आला आहे. ही 23.57 किमी लांबीची मार्गिका कल्याण, डोंबिवली आणि तळोजा औद्योगिक पट्ट्यांना नवी मुंबईशी जोडेल.

कल्याण–पेंधर मेट्रो मार्गिका 12 ला गती
कल्याण : मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे झपाट्याने विस्तारत असताना कल्याण ते पेंधर (नवी मुंबई) मेट्रो मार्गिका क्रमांक 12 बाबत नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामाला आता वेग आला असून डोंबिवली एमआयडीसी मेट्रो स्थानकाजवळ 100वा गर्डर यशस्वीपणे उभारण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) हा टप्पा प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड असल्याचे स्पष्ट केले आहे.
काम वेगात, 19 स्थानकांवर प्रगती सुरू
एकूण 19 स्थानकांच्या या मेट्रो मार्गिकेचे बांधकाम सध्या विविध टप्प्यांत सुरू आहे. कल्याण, डोंबिवली आणि तळोजा औद्योगिक पट्ट्यांतून धावणारी ही मेट्रो नवी मुंबईशी थेट जोड देणार आहे. त्यामुळे या परिसरातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मार्गिकेचा आराखडा कसा बदलला?
सुरुवातीला मेट्रो 12 ही तळोजापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली होती. मात्र, नवी मुंबई मेट्रोच्या पेंधर स्थानकाशी थेट कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी आराखड्यात बदल करण्यात आला. तळोजापासून सुमारे चार किलोमीटर पुढे पेंधरपर्यंत मार्ग वाढवण्यात आला आणि त्यानुसार नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली.
या बदलानंतर
मेट्रो 12 ची एकूण लांबी: 23.57 किमी
मार्ग: कल्याण ते पेंधर (नवी मुंबई)
वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवणारी मेट्रो
ही मेट्रो मार्गिका कल्याण–शिळफाटा–तळोजा मुख्य रस्त्याला समांतर धावणार आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
या मार्गिकेला विविध महत्त्वाच्या मेट्रो आणि रेल्वे लाईन्सशी थेट जोड मिळणार आहे.
कल्याण येथे: ठाणे–कल्याण मेट्रो 5
हेदूटणे येथे: प्रस्तावित विक्रोळी–बदलापूर मेट्रो 14
अमनदूत येथे: नवी मुंबई मेट्रो 1
कल्याण जंक्शन: मध्य रेल्वेचे थेट कनेक्शन
याशिवाय, मेट्रो 5 पुढे घाटकोपर–वडाळा मेट्रो 4 शी जोडली जाणार असून, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान मेट्रो 11 (भूमिगत) चे कामही सुरू आहे. परिणामी मेट्रो 12 ही उत्तर ते दक्षिण अशा सुमारे 13 मेट्रो मार्गिकांशी जोडली जाणार आहे.
प्रकल्प कधी पूर्ण होणार?
MMRDA च्या माहितीनुसार, कल्याण–पेंधर मेट्रो 12 प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मेट्रो 12 वरील संभाव्य स्थानके
या मार्गिकेवर खालील 19 स्थानके प्रस्तावित आहेत.
कल्याण
बाजार समिती
गणेशनगर
पिसवली गाव
गोळवली
डोंबिवली एमआयडीसी
सागांव
सोनारपाडा
मानपाडा
हेदूटणे
कोळेगाव
निळजे गाव
वडवली (खुर्द)
बाले
वाकलान
तुर्भे
पिसार्वे डेपो
पिसार्वे
अमनदूत
ही मेट्रो सुरू झाल्यानंतर कल्याण–डोंबिवली आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे.

