Meenatai Thackeray : दादर शिवाजी पार्कमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकणारा आरोपी उपेंद्र पावसकर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. त्याने संपत्ती वादातून कृत्य केल्याचा दावा केला असून यामुळे ठाकरे गट संतप्त झाला.
Meenatai Thackeray : मुंबईच्या दादर शिवाजी पार्कमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याच्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याची ओळख उपेंद्र गुणाजी पावसकर अशी आहे. विशेष म्हणजे तो ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा चुलत भाऊ असल्याची माहितीही समोर आली आहे.
संपत्ती वादातून धक्कादायक खुलासा
आरोपी उपेंद्रने चौकशीत धक्कादायक खुलासा करत, "संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत आहेत," असा गंभीर आरोप केला आहे. तसेच, तो सतत दादर पोलिस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी जात असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
संतप्त ठाकरे गट आणि नेत्यांची भेट
घटना समजताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि पुतळ्याजवळ मोठी गर्दी जमली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुतळ्याची पाहणी करून पोलिसांना २४ तासांत आरोपीला पकडण्याची मागणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः घटनास्थळी जाऊन पुतळ्याला पुष्प अर्पण केले आणि परिस्थितीची पाहणी केली.
उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
घटनेबाबत माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,
“हा प्रकार निंदनीय असून तो कुणा बेवारस किंवा स्वतःच्या आई-वडिलांचं नाव घेण्यास लाज वाटणाऱ्या व्यक्तीकडून घडला असावा. अन्यथा बिहारमध्ये मोदींच्या मातोश्रींचा अपमान करून जसा बिहार बंद करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला, तसाच महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न असू शकतो.” तसेच, त्यांनी शांतता राखण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना केले.
कोण होत्या मीनाताई ठाकरे, त्या म्हणजे शिवसैनिकांची 'आई'
मीनाताई ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात आदराने घेतले जाते. त्या शिवसेनाप्रमुख आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी होत्या. बाळासाहेबांच्या वादळी राजकीय जीवनात, ठाकरे कुटुंबाला आणि विशेषतः लाखो शिवसैनिकांना आधार देणाऱ्या मांसाहेब म्हणून त्यांची ओळख आहे.
व्यक्तिगत जीवन:
मीनाताई ठाकरे यांचे लग्नापूर्वीचे नाव सरला वैद्य होते. १३ जून १९४८ रोजी त्यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी विवाह झाला. त्यांना बिंदुमाधव ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही दोन मुले होती. राज ठाकरे यांचे मीनाताई ठाकरेंशी खास नाते होते आणि ते त्यांना 'मांसाहेब' म्हणून संबोधित असत. राज ठाकरे यांच्या वडिलांचा (श्रीकांत ठाकरे, बाळासाहेबांचे बंधू) विवाह मीनाताईंच्या बहिणी कुंदा ठाकरे यांच्याशी झाला होता. त्यामुळे मीनाताईंचे नाते राज ठाकरे यांच्याशी मावशी आणि काकी असे दुहेरी होते.
शिवसैनिकांची 'मांसाहेब'
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी करताना आणि राजकीय जीवनातील अनेक चढ-उतारांमध्ये मीनाताई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांचे सर्वात मोठे योगदान हे लाखो शिवसैनिकांना आईची माया देण्यात होते. शिवसैनिकांसाठी त्या केवळ बाळासाहेबांच्या पत्नी नव्हत्या, तर त्या सगळ्यांची मांसाहेब (आई) होत्या. त्यांच्यासाठी त्या पूजनीय होत्या.
बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय जीवनातील ताण आणि संघर्षाच्या काळात, मीनाताईंनी ठाकरे कुटुंबाला एकत्र ठेवण्यात आणि बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहून संसार सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मीनाताई ठाकरे यांचे दुर्दैवी निधन ६ सप्टेंबर १९९५ रोजी झाले. शिवसैनिकांकडून त्यांचा वाढदिवस ६ जानेवारी हा दिवस 'ममता दिन' म्हणून साजरा केला जातो. मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला आहे, जो त्यांच्या स्मृतींना उजाळा देतो. मीनाताई ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या राजकारणाला भावनिक आणि कौटुंबिक आधार देत, शिवसैनिकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे.


