Mumbai : मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञाताने लाल रंग फेकल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली असून ठाकरे गट व शिंदे गट दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकल्याची धक्कादायक घटना घडली. बुधवारी पहाटे सहा ते सातच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
मीनाताई ठाकरे यांचे योगदान
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांचे 1995 मध्ये निधन झाले. त्यांच्या स्मृतींमध्ये शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारावर हा पुतळा उभारण्यात आला आहे. माँसाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीनाताईंच्या स्मारकाजवळच बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकही आहे.
ठाकरे गटाचा संताप
लाल रंग फेकल्याची घटना समजताच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तातडीने पुतळ्याची साफसफाई केली. हा रंग ऑइल पेंट असल्याचे पोलिसांनी सांगितले. गर्दुल्याने हा प्रकार केला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, ठाकरे गटाने याला गंभीरतेने घेत आरोपीचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे.
संवेदनशील परिसरात घडला प्रकार
शिवाजी पार्क हा सदैव गजबजलेला भाग असून येथे सकाळी मोठ्या प्रमाणावर लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात. जवळच शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणे असल्यामुळे हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.
दोन्ही शिवसेनांचा आक्रमक पवित्रा
ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर व खासदार अनिल देसाई यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि उद्धव ठाकरे यांना याची माहिती दिली. तर, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही आक्रमक भूमिका घेत, "अशा नतद्रष्टांना शोधून धुलाई करू," असा इशारा दिला.


