रविवार, ३० ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेवर विद्याविहार-ठाणे आणि ठाणे-वाशी/नेरूळ ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल सेवा रद्द राहतील, तर अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे.

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेवर रविवार, ३० ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार-ठाणे दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसह ठाणे-वाशी/नेरूळदरम्यानच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर हा ब्लॉक असेल. त्यामुळे या कालावधीत काही लोकल सेवा रद्द किंवा प्रभावित होणार आहेत. तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

विद्याविहार-ठाणे मार्गावर ब्लॉक

विद्याविहार-ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी ८ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान ठाणे येथून सुटणाऱ्या काही मेल-एक्स्प्रेस गाड्या अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. एलटीटीकडे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच डाऊन दिशेने धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार येथे डाऊन जलद मार्गावर वळवून पुढे ठाणे येथे पाचव्या मार्गावर आणण्यात येतील.

या एक्स्प्रेस गाड्यांना होणार उशीर

मेगाब्लॉकमुळे गोदान एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत, पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन, पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस, मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस, राजगीर-एलटीटी जनता एक्स्प्रेस, काकिनाडा पोर्ट-एलटीटी एक्स्प्रेस आणि बनारस-एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेसला विलंब होण्याची शक्यता आहे.

ट्रान्स-हार्बर मार्गावर पाच तास सेवा बंद

ठाणे-वाशी/नेरूळदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे-वाशी, नेरूळ आणि पनवेलदरम्यानच्या अप-डाऊन ट्रान्स-हार्बर लोकल सेवा बंद राहतील. ठाण्याहून वाशी, नेरूळ आणि पनवेलकडे जाणाऱ्या तसेच या स्थानकांहून ठाण्याकडे येणाऱ्या लोकल रद्द राहतील.

बेलापूर-उरण सेवा मात्र सुरू

दरम्यान, ब्लॉकच्या कालावधीत बेलापूर-उरण मार्गावरील लोकल सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रविवारी प्रवासाचे नियोजन करताना मेगाब्लॉकची वेळ लक्षात ठेवून प्रवास करावा.