घाटकोपरमधील एका मॉलजवळ एका तरुणाला आणि त्याच्या मैत्रिणीला मारहाण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत दोन वेळा वाद आणि हाणामारी झाली असून आरोपींच्या पालकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
मुंबई : घाटकोपर पश्चिमेला एका मॉलजवळ एका तरुणाला आणि त्याच्या मैत्रिणीला मारहाण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) १८९(२), १८९(४), ११८(१), ३५२ आणि ३५१(२) कलमांखाली FIR नोंदवण्यात आला आहे. आरोपींच्या पालकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, तो घाटकोपरमध्ये आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता. तिथल्या काही तरुणांकडून तिला सतत त्रास दिला जात होता. संध्याकाळी साधारण ४ वाजता, जेव्हा तो आणि त्याची मैत्रीण बागेत होते, तेव्हा या तरुणांच्या गटाने त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. तक्रारदाराने याला विरोध केला असता, आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एका तरुणाने त्याच्या डोक्यात स्टीलची बाटली मारल्याचा आरोपही त्याने केला आहे. त्याच्या मैत्रिणीला देखील मारहाण करण्यात आली. त्यानंतर या दोघांनीही उपचारांसाठी रुग्णालय गाठले. तक्रारदाराने पुढे सांगितले की, त्याच दिवशी संध्याकाळी ते दोघे बागेत फोटो काढत असताना, या तरुणांनी पुन्हा त्यांच्याशी वाद घातला आणि दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी त्याने कायदेशीर कारवाईची मागणी केली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
दरम्यान, मागच्या आठवड्यात बुधवारी दुपारी मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील माकडवाला कंपाउंडमध्ये जुन्या वादातून एका ४० वर्षीय व्यक्तीवर गोळीबार झाला होता. या घटनेत तो जखमी झाला. ही घटना दुपारी १२:४० च्या सुमारास विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. विनोद मल्लापा पवार (वय ४०) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून आरोपीने पवार यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर पवार यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचाही पुढील तपास सुरू आहे.
















