Mumbai Food Poisoning : मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद फूड पॉयझनिंगमुळे मृत्यू झाला. रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्ल्याने या चौघांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला.

Mumbai Food Poisoning : मुंबईच्या पायधुनी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे एकाच कुटुंबातील चार जणांचा घरात जेवणानंतर काही तासांतच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यामागे गंभीर फूड पॉयझनिंग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अब्दुल्ला डोकाडिया (वय ४०), त्यांची पत्नी नसरीन (वय ३५) आणि त्यांच्या दोन मुली आयेशा (वय १६) आणि झैनब (वय १३) अशी मृतांची नावं आहेत. शनिवारी रात्री या कुटुंबाने नातेवाईकांसाठी जेवणाचा बेत ठेवला होता, पण रविवारची सकाळ उजाडण्याआधीच त्यांची प्रकृती अचानक बिघडली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पोलिसांनी काय म्हटले? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास कुटुंबातील नऊ जणांनी एकत्र बिर्याणी आणि पुलाव खाल्ला. पाहुणे निघून गेल्यानंतर, फक्त डोकाडिया कुटुंबातील चौघांनी कलिंगड खाल्ले. त्यानंतर काही तासांतच या चौघांनाही तीव्र उलट्या, जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास सुरू झाला. चौघांनाही एकाच वेळी सारखीच लक्षणं दिसू लागल्याने, त्यांनी खाल्लेलं कलिंगड दूषित असावं, या शक्यतेवर आता तपास यंत्रणा लक्ष केंद्रित करत आहेत.

डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

या कुटुंबावर सर्वात आधी उपचार करणारे डॉ. झियाद कुरेशी यांनी त्यांची अवस्था किती गंभीर होती हे सांगितलं. ते म्हणाले, "त्यांना उलट्या आणि जुलाब होत होते. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, तेव्हा त्यांनी कलिंगड खाल्ल्याचं मला सांगितलं." रुग्णालयात सर्वात आधी लहान मुलीचा मृत्यू झाला, त्यानंतर आई आणि मोठ्या मुलीने प्राण सोडले. अब्दुल्ला यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, पण त्यांचाही मृत्यू झाला.

अपघाती मृत्यूची नोंद

पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, फॉरेन्सिक टीम आणि महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी समांतर तपास सुरू केला आहे. कुटुंबाच्या घरातून अर्धवट खाल्लेल्या कलिंगडाचा तुकडा जप्त करण्यात आला असून तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला आहे. मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोस्ट-मॉर्टम दरम्यान घेतलेले जैविक नमुनेही तपासले जात आहेत. यातून बॅक्टेरिया, विषारी घटक किंवा इतर कोणत्या पदार्थाने ही जीवघेणी रिॲक्शन झाली, हे स्पष्ट होईल.

मृतदेहांच्या शवविच्छेदनातून खुलासा होण्याची शक्यता

पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे म्हणाले, "पोस्ट-मॉर्टमवेळी मृतदेहांमधून घेतलेले नमुने पुढील तपासासाठी पाठवण्यात आले आहेत." फळातच काही दोष होता, ते साठवण्याची पद्धत चुकली होती की घरातच इतर कोणत्या कारणामुळे ते दूषित झालं, याचाही अधिकारी शोध घेत आहेत. सध्या कोणतीही शक्यता नाकारण्यात आलेली नाही.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, फूड पॉयझनिंगच्या घटना सामान्य असल्या तरी, संपूर्ण कुटुंबाचा बळी घेणारे प्रकार दुर्मिळ असतात. असं सहसा अत्यंत दूषित अन्न किंवा विषारी पदार्थ पोटात गेल्यानेच होतं. या धक्कादायक घटनेमुळे उन्हाळ्यात अन्न सुरक्षेचा, विशेषतः कापलेली फळं जास्त तापमानात अयोग्य पद्धतीने साठवण्याचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. आता तपास यंत्रणा टॉक्सिकोलॉजी आणि हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्टची वाट पाहत आहेत. या रिपोर्टमधूनच मुंबईतील या कुटुंबाचा अवघ्या १२ तासांत मृत्यू का झाला, या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे.