शिवाजी पार्क विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वाहनासमोर उभी राहिल्यामुळे मॉडेल रिया यादव अहिर चर्चेत आली होती. पण तिला आता सोशल मीडियावर ट्रोलिंग, बुलिंगचा सामना करावा लागत आहे.
मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्क येथे नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वाहनासमोर ठामपणे उभी राहणारी मॉडेल रिया यादव अहिरची जोरदार चर्चा झाली. तिचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले. यानंतर आता पुन्हा रिया यादव अहिर ऑनलाइन ट्रोलिंग आणि छळामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सातत्याने होणारा छळ, बदनामी, अश्लील कमेंट्स (Slut-Shaming) आणि मानहानिकारक पोस्ट्सविरोधात रियाने महाराष्ट्र सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे.
व्हायरल व्हिडिओनंतर सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना
२२ जुलै रोजी शिवाजी पार्क येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी रिया यादव अहिर पोलिसांच्या वाहनासमोर एकटी उभी राहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर अनेकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. तर काही सोशल मीडिया युजर्सने तिच्यावर आक्षेपार्ह आणि मानहानीकारक पोस्ट्स केल्याचा आरोप आहे.
सायबर सेलमध्ये ऑनलाइन तक्रार, वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
शनिवारी रियाने महाराष्ट्र सायबर सेलकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली. त्यानंतर सोमवारी तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधितांविरोधात एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी केली. सोशल मीडियावरील सातत्यपूर्ण ट्रोलिंग आणि बदनामी थांबवण्यासाठी कठोर कारवाईची मागणी तिने केली आहे.
‘मत मांडण्याचा अधिकार आहे, पण बदनामी करण्याचा नाही’
या प्रकरणावर बोलताना रिया म्हणाली, “प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, कोणालाही दुसऱ्याची बदनामी करण्याचा किंवा त्याला कमी लेखण्याचा अधिकार नाही. हे आंदोलन कोणत्याही पक्ष, धर्म किंवा व्यक्तीसाठी नव्हते. तर आपल्या सर्वांच्या हक्कांसाठी होते. चुकीच्या गोष्टींविरोधात मी यापुढेही आवाज उठवत राहीन.”
'ऑनलाइन छळ माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचू शकतो'
रियाने सांगितले की, सोशल मीडियावर तिच्याविरोधात सातत्याने ट्रोलिंग, बुलिंग, शिवीगाळ आणि अश्लील स्वरूपाच्या कमेंट्स केल्या जात आहेत. हा ऑनलाइन छळ भविष्यात अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यासोबत आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचीही चिंता व्यक्त केली.
कोण आहे रिया यादव अहिर?
रिया यादव अहिर ही २७ वर्षीय मॉडेल, अभिनेत्री आणि उद्योजिका असून ती मुंबईत राहते. फॅशन आणि मनोरंजन क्षेत्रात ती सक्रिय आहे. तसेच 'रियासत' (Riyasat) या कपड्यांच्या ब्रँडशीही तिचा संबंध असल्याचे वृत्त आहे. शिवाजी पार्क आंदोलनातील तिच्या भूमिकेमुळे ती देशभर चर्चेत आली.


