Mumbai : महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर हजारो अनुयायांची गर्दी उसळली असून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
Mumbai : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. कालपासूनच हजारो अनुयायी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत असून आजही ‘भीमसागर’ पाहायला मिळत आहे. समाजातील सर्वच घटकांकडून बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती
या महत्त्वाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक मान्यवरांनी चैत्यभूमीवर उपस्थित राहून बाबासाहेबांना वंदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की पुढील ६ डिसेंबरपर्यंत स्मारकाचा मोठा भाग पूर्ण करण्याचे लक्ष्य सरकारचे आहे.
बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचा गौरव
समारंभात बोलताना मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या द्रष्टेपणाचा गौरव केला. अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील गव्हर्नर त्यांच्या भेटीत “अमेरिकेत राष्ट्रीय वीज ग्रीड नसल्यामुळे वीजटंचाई निर्माण होते” असे सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की बाबासाहेबांनी वीजमंत्री असताना ‘राष्ट्रीय वीज ग्रीड’ संकल्पना मांडत संपूर्ण देशाला जोडणारा ऐतिहासिक निर्णय घेतला, ज्याची फळे आज देशातील प्रत्येक नागरिकाला मिळत आहेत. प्रगत राष्ट्रांनाही न सापडलेला दूरदृष्टीपूर्ण मार्ग बाबासाहेबांनी दशकांपूर्वी दाखवला, असे ते म्हणाले.
इंदू मिल स्मारक पुढील वर्षी तयार
इंदू मिलमधील जागतिक दर्जाच्या स्मारकाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की स्मारक पुढील महापरिनिर्वाण दिनापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकल्पात डॉ. बाबासाहेबांचा ४५० फूट उंच भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ ऑक्टोबर २०१५ रोजी झाले होते. सध्या काम जलदगतीने सुरू असून याला ‘जागतिक दर्जाचे स्मारक’ म्हणून विकसित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.


