BMC Elections 2025 : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले की मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती आल्यास त्यांच्या गटाचा महापौर होईल, तर महायुती नसेल तर ते स्वतंत्रपणे महापौर देणार.
BMC Elections 2025 : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टपणे सांगितले की, मुंबई महापालिकेत शिवसेना–भाजप महायुती आल्यास त्यांचाच महापौर होणार आहे. “मुंबई जिंकायची असेल तर महायुती अत्यावश्यक आहे,” असे त्यांचे मत. त्यांनी म्हटलं की, नगरपालिकेतील विभाजनाचा फटका महायुतीला बसला आणि त्याचा सरळ फायदा महाविकास आघाडीला झाला. त्यामुळे आता दोन्ही पक्षांचे नेते सावध असतील आणि आवश्यक ती काळजी घेतील, असे त्यांनी नमूद केले.
महायुती नसेल तर आम्ही आमचा महापौर – गायकवाड
गायकवाड यांनी पुढे सांगितले की, भाजप जास्त जागांवर लढणार असल्याने ते महापौर त्यांच्या पक्षाचा होईल असा दावा करू शकतात. मात्र, जर महायुती झाली नाही, तर शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्र लढत देत स्वतःचा महापौर निवडून आणेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
“सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात” हे १००% खोटं – संजय गायकवाड
भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या “सगळे पक्ष देवाभाऊ चालवतात” या वक्तव्यावर देखील गायकवाडांनी टीका केली. त्यांनी सांगितले की, हे लोढा यांचे वैयक्तिक मत असून आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्याने आणि ठोस अजेंड्यावर चालतो.
“आम्ही केलेल्या क्रांतीमुळेच भाजप आणि महायुती सत्तेत आहेत,” असेही ते म्हणाले. शिवसेना हा पक्ष नियोजन, ध्येय आणि धोरणावर चालतो, देवाभाऊवर नव्हे, असे त्यांनी तिखट उत्तर दिले.
‘वृक्षांशी आस्था जोडलेली; विकासात पर्यावरणाचा विसर नको’
कुंभमेळा निमित्त मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्याविरोधातही गायकवाड यांनी भूमिका स्पष्ट केली. “या झाडांशी अनेकांची आस्था आणि भावना जोडलेली आहे. विकास करताना जंगलांचा ऱ्हास होतोय, पर्यावरणाला धोका वाढतोय, ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न तीव्र होतोय. त्यामुळे शिवसेना जनतेसोबत ठामपणे उभी आहे,” असे ते म्हणाले.


