- Home
- Mumbai
- मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबई सेंट्रलऐवजी आता 'या' गाड्या वांद्रे टर्मिनसवरून सुटणार; प्रवाशांसह स्टॉलधारकांचेही धाबे दणाणले
मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबई सेंट्रलऐवजी आता 'या' गाड्या वांद्रे टर्मिनसवरून सुटणार; प्रवाशांसह स्टॉलधारकांचेही धाबे दणाणले
Mumbai Central Train Schedule Changes : पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रलवरील प्लॅटफॉर्म रुंदीकरणाच्या कामामुळे काही महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्या वांद्रे टर्मिनसवरून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबई सेंट्रलऐवजी आता 'या' गाड्या वांद्रे टर्मिनसवरून सुटणार
मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर सध्या प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने, इथून सुटणाऱ्या काही महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्या आता वांद्रे (बांद्रा) टर्मिनसवरून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या बदलामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन बदलताना कसरत करावी लागत आहे.
वंदे भारत एक्स्प्रेससाठी मोठे बदल
मुंबई सेंट्रलवरून सध्या दोन 'वंदे भारत' एक्स्प्रेस धावत आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, यातील १६ डब्यांची वंदे भारत आता २० डब्यांची केली जाणार आहे. मात्र, मुंबई सेंट्रलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर सध्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने तिथे २० डब्यांच्या गाड्या उभा करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. याच तांत्रिक कारणामुळे रेल्वेने गाड्यांचे नियोजन इतर स्थानकांवर हलवण्यास सुरुवात केली आहे.
वांद्रे येथून धावणाऱ्या गाड्यांची यादी
प्लॅटफॉर्मच्या कमतरतेमुळे आणि तांत्रिक कामांमुळे खालील गाड्यांवर परिणाम झाला आहे.
कर्णावती एक्स्प्रेस: आता मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनसवरून धावेल.
गोल्डन टेम्पल मेल: ही गाडी देखील वांद्रे स्थानकातून सुटेल.
पश्चिम एक्स्प्रेस: या महत्त्वाच्या गाडीचेही स्थानक तात्पुरते बदलण्यात आले आहे.
प्रवाशांना मनस्ताप, स्टॉलधारकांचे आर्थिक नुकसान
रेल्वेच्या या निर्णयाचा दुहेरी फटका बसत आहे. एकीकडे प्रवाशांना ऐनवेळी वांद्रे टर्मिनस गाठावे लागत असल्याने गोंधळ उडत आहे, तर दुसरीकडे मुंबई सेंट्रलवरील स्टॉलधारकांचे कंबरडे मोडले आहे. एका स्टॉलधारकाने आपली व्यथा मांडताना सांगितले की, “आम्ही जेव्हा स्टॉलसाठी टेंडर भरतो, तेव्हा स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या पाहून बोली लावतो. आता गाड्याच दुसऱ्या स्थानकावर हलवल्या गेल्याने आमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर घटला आहे.”
नेमकी अडचण काय?
मुंबई सेंट्रलवर सध्या सुरू असलेल्या कामामुळे फलाटांची उपलब्धता कमी झाली आहे. २० डब्यांची नवीन वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यासाठी जी जागा हवी आहे, ती सध्या उपलब्ध नाही. काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांना वांद्रे टर्मिनसचा पर्याय वापरावा लागणार आहे.

