- Home
- Mumbai
- MHADA Lottery 2026 : म्हाडाकडून नववर्षात आनंदाची भेट! मुंबईसह कोकणातील प्राईम लोकेशनवर मिळणार परवडणारी घरे
MHADA Lottery 2026 : म्हाडाकडून नववर्षात आनंदाची भेट! मुंबईसह कोकणातील प्राईम लोकेशनवर मिळणार परवडणारी घरे
MHADA Lottery 2026 : म्हाडा कोकण मंडळ 2026 च्या सुरुवातीला नवीन घरांची लॉटरी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. या लॉटरीत ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा रोड यांसारख्या भागांतील घरांचा समावेश असेल, जी बाजारभावापेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होतील.

म्हाडाकडून नववर्षात आनंदाची भेट!
मुंबई : स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाकडून मोठी खुशखबर समोर येत आहे. म्हाडा कोकण मंडळ 2026 च्या सुरुवातीलाच नवीन घरांची लॉटरी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे मागील लॉटरीत ज्यांना घर मिळू शकले नाही, अशा नागरिकांना पुन्हा एकदा सुवर्णसंधी मिळणार आहे.
मागील लॉटरीतील अपयशानंतर नवी संधी
म्हाडा कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील लॉटरीत न विकली गेलेली घरे तसेच नव्याने उपलब्ध झालेल्या घरांची माहिती सध्या संकलित केली जात आहे. जानेवारी 2026 मध्ये या लॉटरीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे.
गेल्या सप्टेंबरमध्ये पार पडलेल्या अंतिम लॉटरीत तब्बल 5,354 घरांसाठी 1.58 लाखांहून अधिक अर्ज आले होते, मात्र अनेक अर्जदारांना यश मिळाले नव्हते. आता त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आशेची किरणे दिसू लागली आहेत.
कोणत्या शहरांत मिळणार घरे?
या आगामी लॉटरीत ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा रोड तसेच कोकण विभागातील इतर महत्त्वाच्या भागांतील घरांचा समावेश असणार आहे. या परिसरातील वाढती मागणी पाहता लॉटरीकडे नागरिकांचा मोठा ओढा राहणार, हे निश्चित आहे.
म्हाडा घरे का ठरतात पहिली पसंती?
मुंबई व महाराष्ट्रातील रिअल इस्टेटच्या वाढत्या किमती पाहता, म्हाडाची घरे बाजारभावापेक्षा 25 ते 40 टक्क्यांनी स्वस्त मिळतात. त्यामुळे मध्यमवर्गीय व सर्वसामान्य नागरिकांसाठी म्हाडा लॉटरी ही घर मिळवण्याची सर्वात विश्वासार्ह आणि परवडणारी संधी ठरते.
2026 ची म्हाडा लॉटरी नवी आशा घेऊन येणारी
घराच्या स्वप्नासाठी अनेक वर्षे वाट पाहणाऱ्यांसाठी 2026 ची म्हाडा लॉटरी नवी आशा घेऊन येत आहे. योग्य तयारी करून अर्ज करणाऱ्यांना यावेळी नक्कीच यश मिळू शकते.

