- Home
- Mumbai
- MHADA Lottery 2026 : मार्चमध्ये म्हाडाची महालॉटरी! मुंबईसह कोकण मंडळात हजारो परवडणारी घरे उपलब्ध होणार
MHADA Lottery 2026 : मार्चमध्ये म्हाडाची महालॉटरी! मुंबईसह कोकण मंडळात हजारो परवडणारी घरे उपलब्ध होणार
MHADA Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळातर्फे लवकरच मोठी घरसोडत जाहीर होणार आहे. या लॉटरीद्वारे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि विरार परिसरात सुमारे ७००० परवडणारी घरे उपलब्ध होतील.

मार्चमध्ये म्हाडाची महालॉटरी!
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर आता मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने आणि कोकण मंडळाने घरांच्या सोडतीची तयारी पूर्ण केली असून, लवकरच मोठ्या प्रमाणात घरांची लॉटरी जाहीर होणार आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि विरार परिसरात परवडणाऱ्या किमतीत घर मिळवण्याची सुवर्णसंधी नागरिकांना मिळणार आहे.
मध्यमवर्गीयांच्या घराच्या स्वप्नाला नवी आशा
मुंबईसारख्या महानगरात स्वतःचे घर असावे, हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, वाढत्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न पूर्ण करणे मध्यमवर्गीयांसाठी कठीण ठरते. अशा परिस्थितीत म्हाडाकडून मिळणारी घरांची सोडत ही घर खरेदीसाठी मोठी संधी मानली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुमारे 3000 घरांची लॉटरी काढण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.
मार्च 2026 मध्ये लॉटरीची दाट शक्यता
अलीकडेच मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून, निवडणूक प्रक्रियेनंतर आता म्हाडाने घरांच्या सोडतीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मार्च 2026 मध्ये मुंबई मंडळाची घरांची लॉटरी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोकण मंडळही नागरिकांसाठी मोठी सोडत काढणार आहे.
कोकण मंडळात 4000 घरांची तयारी
मुंबई मंडळासोबतच म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे, नवी मुंबई आणि विरार परिसरात सुमारे 4000 घरांची सोडत काढण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात मुंबई महानगर प्रदेशात नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होणार आहेत. या घरांकडे हजारो इच्छुक अर्जदारांचे लक्ष लागले आहे.
पायाभूत सुविधांवर विशेष भर
म्हाडाने केवळ घरेच नव्हे, तर रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि इतर मूलभूत सुविधा यांकडेही विशेष लक्ष दिले आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीमध्ये
बी.डी.डी. चाळ पुनर्विकास
पत्रा चाळ
मोतीलाल नगर
यांसारख्या मोठ्या पुनर्विकास प्रकल्पांतील घरांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
76 वर्षांचा प्रवास, 9 लाख घरे
म्हाडाच्या 76 वर्षांच्या वाटचालीत आतापर्यंत सुमारे 9 लाख घरांची निर्मिती करण्यात आली आहे. मार्च 2026 मधील ही प्रस्तावित लॉटरी सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. विशेष म्हणजे, बाजारभावाच्या तुलनेत निम्म्या किमतीत घरे उपलब्ध होत असल्याने, यंदाही मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

