मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे. दरम्यान, त्यांना पोलिसांनी घालून दिलेल्या अटी आणि शर्ती पाळाव्या लागतील.
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला अखेर परवानगी मिळाली आहे. मात्र ही परवानगी काही अटी व शर्तींसह देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील उपोषणकर्त्यांनी आंदोलनासाठी केलेल्या मागणीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आझाद मैदान पोलीस ठाणे यांनी ही परवानगी दिली.
प्रमुख अटी व शर्ती:
- स्थळ व वेळ : आंदोलन फक्त आझाद मैदानातील राखीव जागेतच करता येईल. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत आंदोलन करण्याची मुभा असेल. ठरलेल्या वेळेनंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही.
- आंदोलकांची संख्या : जास्तीत जास्त ५,००० आंदोलकांना सहभागी होण्याची परवानगी आहे. मैदानाचा राखीव भाग साधारण ७,००० चौ. मीटर असून ही जागा ५,००० लोकांना पुरेशी ठरेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
- वाहतूक व्यवस्थापन : आंदोलकांची वाहने मुंबईत आल्यानंतर ईस्टर्न फ्रीवे मार्गे वाडीबंदर जंक्शनपर्यंतच येऊ शकतील. त्यानंतर नेत्यांसोबतची केवळ ५ वाहने आझाद मैदानापर्यंत जाऊ शकतील. उर्वरित वाहने शिवडी, ए-शेड आणि कॉटनग्रीन परिसरात पार्क करावी लागतील. गणेशोत्सव काळात वाहतुकीत अडथळा होऊ नये, यासाठी हे नियम घालण्यात आले आहेत.
इतर अटी :
- आंदोलनाला फक्त एका दिवसाचीच परवानगी असेल.
- शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनास मुभा मिळणार नाही.
- परवानगीशिवाय ध्वनीक्षेपक वा मोठ्या आवाजाची साधने वापरता येणार नाहीत.
- आंदोलनादरम्यान अन्न शिजवणे किंवा कचरा टाकणे कडक मनाई आहे.
- लहान मुले, गर्भवती स्त्रिया आणि वृद्धांना आंदोलनात सहभागी करू नये, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.


