मराठा आरक्षणासाठी लातूरच्या एक तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या दिवशी ही घटना घडल्याने दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी दिलेला अल्टिमेटम संपताच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्टपासून मुंबईत मोठं आंदोलन उभारलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून हजारो आंदोलनकर्त्यांचे ताफे चारचाकी व दुचाकींनी मुंबईकडे रवाना होत आहेत. दरम्यान, लातूरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हमदपूर तालुक्यातील शिंदगी बु्द्रुक येथील बळीराम मुळे (वय ३५) या तरुणाने मंगळवारी सायंकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. "मराठा आरक्षणासाठी मी हे टोकाचं पाऊल उचलतो आहे, जरांगे पाटील मला माफ करा," असे शब्द त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले.

बळीराम मुळे यांचे लग्न झाले असून त्यांना दोन मुली आहेत. भावासोबत दहा एकर कोरडवाहू शेतीवर ते शेती करत होते. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या चिठ्ठीत मांडला आहे. सुदैवाने शेतातच त्यांना पाहून मित्रपरिवाराने तात्काळ लातूर येथील कवठाळे रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बीड–पुणे महामार्गावरील वाहतुकीची व्यवस्था बदलण्यात आली आहे. अंतरवली सराटी येथून निघालेला आंदोलनाचा ताफा शहागड, तुळजापूर, पैठण व शेवगाव मार्गे २९ ऑगस्टपर्यंत मुंबईत दाखल होणार आहे.