मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाल्यानंतर आंदोलकांना काही सुचना दिल्याच. पण भाषणही केले. यावेली जरांगे यांनी म्हटले की, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय येथून हलणार नाही. 

मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले. सकाळी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह त्यांनी मुंबई गाठली आणि हजारो कार्यकर्त्यांसह उपोषणाला सुरुवात केली. "डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलणार नाही" असा ठाम निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दोन तासांत मुंबई रिकामी करा – जरांगे

आझाद मैदानावर पाऊल टाकताच जरांगेंनी मोठं आवाहन केलं. "सरकार सहकार्य करत नव्हतं म्हणून मराठे मुंबईत आले, पण आता सरकारने आंदोलनासाठी परवानगी दिली आहे. त्यांनी सहकार्य दाखवलं, त्यामुळे आपणही शांततेत सहकार्य करायला हवं," असं ते म्हणाले. आंदोलकांना त्यांनी स्पष्ट सांगितलं की कोणीही जाळपोळ, दगडफेक किंवा गोंधळ घालायचा नाही. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने काही आंदोलकांनी पुढील दोन तासांत वाशीमध्ये जाऊन मुक्काम करावा, अशीही सूचना त्यांनी केली.

शांततेचा आणि संयमाचा संदेश

मनोज जरांगेंनी आपल्या समर्थकांना शांततेचं आवाहन करताना विशेष सूचनाही दिल्या. "मुंबईत आंदोलकांची अडचण होऊ नये, पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे काही समाजबांधवांनी वाशी येथे मुक्काम करावा," असं ते म्हणाले. त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याची सूचना केली आणि "दारू प्यायची नाही, कुणालाही बोलायला संधी द्यायची नाही" अशी ताकीद दिली.

मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार

"मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, सरकारने गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही," अशी स्पष्ट घोषणा जरांगेंनी केली. उपस्थित आंदोलकांना त्यांनी आठवण करून दिली की हा लढा आरक्षणासाठी आहे आणि या मैदानावरच राहून शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं आहे. "माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल असं काहीही करू नका," असं आवाहन करत त्यांनी मराठा आंदोलनाच्या शांततापूर्ण वाटचालीला बळ दिलं.

मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या

1. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत याची अंमलबजावणी करावी.

2. हैदराबाद गॅझेटियर तातडीने लागू करावा.

3. "सगे सोयरे" अध्यादेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी.

4. आंदोलनकर्त्यांवर झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत.

5. कायद्यात बसणारे ठोस आरक्षण द्यावे.

YouTube video player