आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा मनोज जरांगे यांचा निर्धार आहे. याशिवाय जरांगे पाटलांनी आंदोलकांना शिस्त पाळण्याच्या १० सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये हिंसाचार टाळणे, पोलिसांना सहकार्य करणे, मुंबईकरांना त्रास न देणे आदी बाबींचा समावेश आहे.
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरलेले मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. सकाळी दहा वाजता त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात करताच मैदानावर प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. "सरकारने मला गोळ्या घातल्या तरी चालतील, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही," अशी ठाम घोषणा करून त्यांनी मराठा समाजाच्या भावना अधिक तीव्र केल्या. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित हजारो आंदोलकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारली.
शांततेचं आवाहन
आझाद मैदानावर दाखल होताच जरांगे पाटलांनी आपल्या समाजबांधवांना शांततेचं आवाहन केलं. "मुंबई जाम करण्याचा निर्णय आपण घेतला होता, पण आता सरकारने आपल्याला सहकार्य केलं, उपोषणाची परवानगी दिली. त्यामुळे मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की, आंदोलन शांततेत झालं पाहिजे आणि आपल्या शिस्तबद्धतेतूनच समाजाचा संदेश बाहेर गेला पाहिजे.
आंदोलनाची पार्श्वभूमी
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारकडून न्याय मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी "चलो मुंबई"चा नारा दिला होता. या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातून लाखो मराठा समाजबांधव मुंबईत दाखल झाले आहेत. सीएसएमटी परिसर, आझाद मैदान, मुंबई महानगरपालिका आणि वाडी बंदर परिसर आंदोलकांनी फुलून गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही शिस्त राखली गेली आहे.
जरांगेंच्या १० महत्त्वाच्या सूचना
आंदोलनाची दिशा आणि स्वरूप शिस्तबद्ध ठेवण्यासाठी जरांगे पाटलांनी आपल्या समर्थकांना १० महत्त्वाच्या सूचना दिल्या.
1. कोणीही रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालू नये.
2. दगडफेक, जाळपोळ किंवा हिंसात्मक प्रकार करू नये.
3. मुंबई आपण जाम केली आहे, पण पुढील दोन तासांत रस्ते मोकळे करावेत.
4. सर्वांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य द्यावं.
5. सरकारने दिलेल्या मैदानातच झोपावं, काहींनी वाशी येथे जाऊन विश्रांती घ्यावी.
6. गाड्यांची पार्किंग अधिकृत ठिकाणीच करावी, हायवेवर गाड्या उभ्या करू नयेत.
7. मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची जबाबदारी आंदोलकांची आहे.
8. जे मुंबईत सोडण्यासाठी आले आहेत, त्यांनी परत माघारी जावं.
9. आपलं लक्ष्य फक्त आणि फक्त आरक्षणावर केंद्रित ठेवा.
10. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही.
उपोषणाचा निर्धार
मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण आझाद मैदानावर सुरू करताना स्पष्ट केलं की, आता मागे हटण्याचा प्रश्नच नाही. "आपल्याला आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरू राहील. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाचा प्रश्न सुटला पाहिजे," असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलं आहे. सरकारच्या भूमिकेकडे आणि चर्चेच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. पण आंदोलनकर्त्यांनी दाखवलेली शांतता, शिस्त आणि संयम हीच या लढ्याची खरी ताकद असल्याचं चित्र दिसत आहे. जरांगे पाटलांचा निर्धार आणि आंदोलनकऱ्यांचा उत्साह पाहता मराठा आरक्षणाचा प्रश्न आता निर्णायक मार्गावर पोहोचेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


