Mumbai Rain Work From Home : राज्यभरात मुसळधार पावसाने अनेक भाग जलमय झाले आहेत. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबई : राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाने मुंबई, पुण्यासह शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं आहे. नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. ठिकठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. ८ जुलैपर्यंत पावसाची अशीच स्थिती राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

मुंबईतील अनेक परिसरातील सखल भागात पाणी साचलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. जोरदार पावसाने अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये पावसाचं, पुराचं पाणी शिरलं आहे. सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत. नागरिकंच्या मदतीसाठी आपत्कालीन यंत्रणा २४ तास सुरू आहेत. या यंत्रणांकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.


