कल्याणमधील गोदरेज हिल परिसरातील ब्लिंकिट स्टोअरमध्ये आईस्क्रीमच्या फ्रीजरमध्ये उंदीर फिरताना आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुंबई : किराणा सामानापासून आईस्क्रीमपर्यंत विविध वस्तू घरपोच देणाऱ्या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या सेवांमधून खाद्यपदार्थांची साठवणूक आणि स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत का, याकडे ग्राहकांचे लक्ष असते. अशातच कल्याणमधील एका ब्लिंकिट (Blinkit) स्टोअरमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणामधील गोदरेज हिल परिसरातील स्टोअरमध्ये आईस्क्रीम ठेवलेल्या फ्रीजरमध्ये उंदीर फिरताना दिसल्याचा दावा करण्यात आला आहे.
आईस्क्रीमच्या फ्रीजरमध्ये उंदीर दिसल्याचा दावा
समोर आलेल्या माहितीनुसार, काही तरुण आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी संबंधित स्टोअरमध्ये गेले होते. फ्रीजरमध्ये पाकिटबंद फूड्स पाहतानाच त्यांना आतमध्ये उंदीर फिरत असल्याचे दिसून आले. या प्रकाराचा तरुणांनी व्हिडीओ रेकॉर्ड केला. सदर व्हिडीओ समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. याशिवाय एफडीएकडून या स्टोअरवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांवर प्रश्नचिन्ह
क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मशी संबंधित सुविधांची महाराष्ट्रातील अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू असताना ही घटना समोर आली आहे. यापूर्वी महाराष्ट्र एफडीएने राज्यभर तपासणी मोहीम राबवत ब्लिंकिट, झेप्टो आणि इंस्टामार्टशी संबंधित 86 स्टोअरची तपासणी केली होती. या तपासणीत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित विविध त्रुटी आढळल्या गेल्या. यानंतर त्यांना 60 सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच एका सुविधेचे कामकाज तात्पुरते बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. एकूण 14 आस्थापनांचे लायसन्स निलंबित करण्यात आले होते.
घाटकोपरमधील ब्लिकिंटच्या सुविधेतही त्रुटी
एफडीएच्या तपासणीत मुंबईतील घाटकोपर परिसरातील ब्लिंकिटशी संबंधित एका सुविधेचाही समावेश होता. तपासणीदरम्यान अपुरे ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापन, फ्रोजन फूड्सच्या तापमान नियंत्रणाशी संबंधित समस्या, अनपॅक्ड फूड्सच्या स्टोअर भागात अपुरा प्रकाश आणि अस्वच्छता आढळून आली होती. याशिवाय या ठिकाणी एफडीएच्या अधिकाऱ्यांना झुरळेही दिसली होती.
मालाडमधील सुविधेचा FSSAI परवाना निलंबित
मालाड पश्चिमेतील ब्लिंकिंटशी संबंधित आणखी एका सुविधेवरही एफडीएने कारवाई केली होती. तपासणीदरम्यान अनेक नियमांचे उल्लंघन आढळल्यानंतर या स्टोअरचे एफएसएसएआय (FSSAI) लायलन्स रद्द केले होते.


